पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणखीहि मोठमोठे मोहरे प्राणांस मुकले. अली, उमर, अबुबकर सारे जखमी झाले. शत्रूंचा मुहंमदांवर डोळा होता. कांहीं एकनिष्ठ अनुयायांची मांदी मुहंमदांभोवती होती. मुहंमद जखमी झाले होते. रक्त गळत होतें. एक अनुयायी तें थांबवूं पहात होता. त्याच्या हाताचं तशा प्रसंगांतहि पैगंबरांनी प्रेमाने चुंचन घेतलें. किती प्रेमळ त्यांचे हृदय! आणि प्रेमळ हृदये त्यांच्या आसपास मरत होतीं. परंतु इतक्यांत अली आपल्या शूर अनुयायांसह मुहंमदांच्या बचावासाठीं धांवून आले. मुहंमदांसह ते ओहोद टेकडीवर परत आले. अलीने आपल्या ढालीतून पाणी आणले. त्याने प्रेमाने मुहंमदांचं तोंड धुतलें, जखमा धुतल्या आणि भर दुपारी सर्वांनीं प्रार्थना केली. कुरेश हि थकले होते. मदिनेवर चालून जाण्याचे किंवा टेकडीवर प्रार्थना करणाऱ्यांवर चढाई करण्याचे त्यांना धाडस झाले नाही. मुहंमदांकडील जे धर्मवीर मरून पडले होते, त्यांची प्रेतं छिन्नभिन्न करीत ते बसले. त्या वीरांच्या मृत देहांची ते विटंबना करीत होते. अबु सुफियानची पत्नी हिंद व इतर कुरेश स्त्रिया, ज्या लढायांत हुरूप व उत्साह द्यायला आल्या होत्या त्यांनीं क्रूरपणाची कमाल केली. त्या बायांनीं शूर व दिलदार हमजाचे काळीज कापून घेतलें! मृत वीरांचे कान कापून घेतले, नाके कापून घेतली. त्यांचे अलंकार करून त्यांनी कानांत गळ्यांत घातले. त्यांचीं कांकणें करून हातांत घातलीं. ही विटंबना पाहून शांतमूर्ति व क्षमामूर्ति मुहंमदहि सात्त्विक संतापाने लाल झाले. ते संतापाने म्हणाले, "अतःपर यांनाहि असेंच बागवू." परंतु पुन्हा शांत झाले व म्हणाले, "नको असे नको. अन्याय सहनशीलपणें सोसूं या. सहन करूं या. जो शांतीने सहन करील त्याचेच कल्याण होईल. बुरें सोसणाराचं भले होईल." मुहंमदांच्या या उद्गारांनी मुसलमानांस शत्रूशीं दिलदारपणें वागावयास शिकविलें आहे. शत्रूची विटंबना करणें, हालहाल करून मारणें ही गोष्ट मुस्लिम धर्मात संमत नाही. मुहंमदांस हें पसंत नव्हतें. पहिल्या महायुद्धांत शत्रूंच्या कैद्यांस सर्वात चांगल्या रीतीनें तुर्कस्थाननें वागविलें, असें साऱ्या राष्ट्रांनी कबूल केलें.
 या लढाईत अनिर्णितच सामना राहिला. कुरेशहि माघारे गेले. मुहंमद मदिनेंत परत आले. परंतु आपण हताश झालेलों नाहीं, निरुत्साह झालेलों नाहीं हें दाखविण्यासाठीं शत्रूचा पाठलाग करयासाठी त्यांनी एक टोळी पाठवली. अबु सुफियान त्वरा करून मक्केस पोचला. "लौकरच तुमचें निर्मूलन करण्यासाठी पुन्हा

इस्लामी संस्कृति । १०७