पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगण्यांत कांहीं नुकसान नव्हते. परंतु ते मुहंमदांस म्हणाले, "अरे मुहंमदा, कुरेशांचा पराजय केलास म्हणून चढून जाऊं नकोस. कुरेशांना युद्धकला नीट माहीत नाहीं. आमच्याशी दोन हात करायची इच्छा आहे का? ये कर. आम्हीं मर्द आहोत. तुझी खुमखुमी जिरवूं." असें बोलून बनी कैनुकाच्या जमातीचे ज्यू आपल्या गढींत जमले व मुहंमदांची सत्ता झुगारते झाले. त्यांनी बंड उभारले. मुहंमदांनी त्यांच्या गढीला वेढा दिला. पंधरा दिवसांनी ते शरण आले. मुहंमद म्हणाले, "इस्लामी धर्म स्वीकारून या लोकसत्तेत सामील होणार असाल तर रहा. नाहीतर मदिना सोडून जा." ते गेले.
 आतां बनी उन-नुझैर या जमातीचे ज्यू राहिले होते. त्यांच्या मनांत शल्य टोचत होतें. मुहंमद जेव्हां 'दियत' मागायला गेले तेव्हां बरा सांपडला असें त्यांना वाटलें! मुहंमदांनी त्यांची हालचाल जाणली व स्वतःस व आपल्या अनुयायांस वांचविलें. मुहंमदांनी यांनाहि "मदिना सोडून जा. रहायचे असेल तर इस्लामी होऊन रहा." असा निरोप पाठवला. त्यांनीहि पूर्वीच्या ज्यूं-सारखेच घमेंडी उत्तर पाठविलें, ते आपल्या गढींत एक होऊन बंड करते झाले. मुनाफिकीनाची आपणांस मदत होईल, असा त्यांना भरंवसा होता. परंतु ती मदत मिळाली नाहीं. गढीला वेढा घालण्यांत आला. पंधरा दिवसांनी शरण आले. मुहंमद म्हणाले, "रहायचे असेल तर इस्लामी बनून, लोकसत्तेत सामील व्हा. नाही तर जा." ते जायला निघाले. "हत्यारांशिवाय बाकीचें सारें तुमचें घेऊन जा." असें मुहंमदांनी सागितले. जाण्यापूर्वी आपली घरेदारे मुसलमानांस उपयोगीं पडूं नयेत म्हणून तीं मोडूनतोडून मग ज्यू निघून गेले!
 मुहंमदांबरोबर मक्केची घरेदारे सोडून जे लोक आले होते त्यांना मदिनेतील मित्रांकडे वाटून देण्यांत आलें होतें. त्यांना घरदार कांही नव्हतें. परंतु या लोकांना ही ज्यूंची घरं द्यावीं असें मुहंमदाच्या मनांत आले. अनसार जरी या मुहाजिरीनस मदत करीत होते तरी त्यांची कुचंबणा होत होती. मुहंमद अनसारांस म्हणाले, "देऊं का ज्यूंचीं घरें, जमिनी व हत्यारें मक्केहून आले त्यांना?" अनसार आनंदाने म्हणाले, "द्या द्या. ज्यूंचें द्याच. परंतु तेवढ्यानें भागणार नाहीं म्हणून आमच्या मालमत्तेतीलहि त्यांना कांहीं द्या" मुहंमदांनी मुहाजिरीनांस व अनसारांतीलहि दोघां दरिद्रांस ज्यूंची घरेदारें, शेतीवाडी वाटून दिली. अतःपर अशी रूढीच पडली

इस्लामी संस्कृति । १०९