१९३१ सालीं कारावास भोगत असतांना, त्यांनीं हें पुस्तक लिहिलें. हा त्यांचा ग्रंथ अपुरा आहे. १९५० साली झालेल्या त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या उर्वरित कागदपत्रांत हें हस्तलिखित होते.
माझे सन्माननीय मित्र श्री. एम्. हारिस यांनी हें हस्तलिखित वाचलें आणि त्यांच्या सल्ल्यावरूनच या हस्तलिखिताचा पहिला भाग ग्रंथरूपाने प्रसिद्ध होत आहे. या भागांत मुहंमद पैगंबरांचं जीवनचरित्र आले आहे.
पैगंबरांचें जीवन मानवजातीच्या दृष्टीनें अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या जीवित-कार्याचें व त्यांच्या संदेशाचे खरेखुरे महत्त्व पटले तर आपल्या देशांत भावनात्मक ऐक्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेस मोठीच मदत होईल. या ग्रंथांत पैगंबरांच्या कार्याचं महत्त्व लेखकानें ज्या सहृदयतेनें व सहानुभूतीनें जाणलें आहे आणि ज्या सहज आणि उत्कट रीतीनें या कार्याचा गौरव केला आहे, ती रीत अपूर्व आहे. लेखन-विषयाच्या अंतरंगांत प्रवेश करण्यांत लेखकानें असामान्य यश संपादन केलें आहे.
मराठींत महंमद पैगंबरांच्या जीवनावर फारशी पुस्तकें नाहींत. माझी खात्री आहे कीं, साने गुरुजींचा हा ग्रंथ अनेक मराठी वाचक वाचतील आणि या वाचनामुळे अनेकांना पैगंबरांचं व इस्लामचे आकलन अधिक चांगल्या रीतीनें होईल.
साने गुरुजींच्या मित्रांनीं व चाहत्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवलें आहे याचा मला फार संतोष वाटतो. हा मौलिक ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
१२ |
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे