म्हणजेच ईश्वरभक्तीचं परमोच्च कर्म असे त्यांना वाटे. निराळी भक्ति व पूजा आणखी कोठली? सेवा हीच भक्ति, आपापली कर्तव्ये सोडा, असे कधींहि त्यांनी सांगितलें नाहीं. त्यांची शिकवण सर्वसामान्य मनुष्याला झेपणारी आहे. त्यांचा मर्यादा-धर्म आहे. आपापली नियत कर्तव्ये करण्यांतच पुण्य आहे, धर्म आहे. पैगंबर सांगायचे, "मुलांबाळांची उपेक्षा नका करू. ती प्रभूची ठेव आहे. प्रेमानें व हळुवारपणानें मुलांचं संगोपन करा. मुलांनीहि आईबापांस मान द्यावा, प्रेम द्यावें. तुमच्या कर्तव्याच्या वर्तुळांत तुमचे कुटुंबीच फक्त नसावेत, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र व ज्यांचे तोंड खालीं झालें आहे असे अनाथ, त्यांचाहि समावेश तुमच्या कर्तव्याच्या वर्तुळांत आहे हे विसरू नका."
असे हे मुहंमद होते. त्यांच्याहून अधिक विशुद्ध, अधिक प्रतिभाशाली विभूति झाल्या असतील. परंतु जें ईश्वरी कार्य घेऊन मुहंमद आले, त्या कार्याची जितक्या एकरूपतेनें व जितक्या धैर्यशौर्याने व उदात्ततेनें त्यांनी पूर्णता केली, तसे क्वचितच कोणी केले असेल. ईश्वरी संदेश मला द्यावयाचा आहे, ही अखंड जाणीव ठेवून तदर्थ असें सर्व जीवन क्वचित् कोणी दिलें असेल. एका महान् सत्याला त्यांनी जीवनांत स्थान दिलें होतें. त्या सत्यांतून सर्व प्रेरणा घेत होते. तो त्यांचा आनंद तें सत्य म्हणजे ईश्वर एक आहे. हें सत्य त्यांच्याइतकें तीव्रतेनें कोणीहि दिलें नाहीं. त्यांचा अनंत उत्साह या सत्यार्थ होता, क्षुद्र गोष्टीसाठीं नव्हता. असे महापुरुष हे जगाचे, मानवजातीचें मोठें मीठ असतात. मानवजीवन ते सडूं देत नाहींत. स्वच्छ राखतात. मधूनमधून असें दैवी मीठे येत असतें.
आणि त्यांचा अवतार संपला! पैगंबर मेले तेव्हां उमर म्हणाला, "कसे मेले? अशक्य!" अबुबकर म्हणाले, "मित्रांनो, ज्यांनी मुहंमदांची पूजा केली, त्यांनीं लक्षांत घ्यावें कीं मुहंमद मरण पावले. परंतु ज्यांनी ईश्वराची पूजा केली त्यांचा ईश्वर सदैव आहे, तो कधीं मरत नाहीं!"
मुहंमद गेले. परंतु तो एक परमेश्वर सदैव आहे. मुहंमद विसरलेत तरी देव विसरू नका. आणि देवाची स्मृति देणारा, त्याला तरी कोण कसा विसरेल? खरें ना?
回 回 回
१६० ।