पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





प्रास्ताविक चार शब्द

साने गुरुजींच्या पैगंबर चरित्राला मी प्रस्तावनारूप चार शब्द लिहावे, अशी श्री. यदुनाथ थत्ते यांनी मागणी केली आणि मी सहजच ती मान्य केली. अलीकडे मी अशी गोष्ट सहसा स्वीकारीत नाहीं. पण गुरुजींची मुरवत तुटेना.
 गुरुजींनी हे चरित्र भाविकपणानें लिहिलें आहे, ज्या भाविकपणाची अपेक्षा एखाद्या निष्ठावंत मुसलमानाकडून करता येईल. 'सर्वधर्मी समानत्व' ही भावना गुरुजींच्या ठिकाणीं मुरलेली होती. त्यामुळे हे शक्य झालें.
 चरित्रग्रंथाच्या वाचकाच्या ठिकाणीं एक विवेक लागतो. आपल्याला थोरांच्या चरित्राचें अनुकरण करायचे नसतें, त्यांचे चारित्र्य घ्यायचें असतें- हा तो विवेक होय. आणि प्राचीन पुरुषांच्या चरित्राला तो विशेषच लागू असतो. कारण ते आपल्यापासून कालतः दूर असतात. म्हणून 'तुका म्हणे सार धरी.'
 इस्लामच्या निष्ठेत अवतारवाद येत नाहीं. केवढ्याहि मोठ्या पुरुषाला ईश्वराच्या जोडीला बसवणं योग्य नाहीं, असें इस्लामचें समंजस मत आहे.
 या उलट, सर्वच ईश्वरमय असल्यामुळे, 'यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ'. अशा सहृदय चित्तालाच ज्ञानप्रकाश लाभायचा, असा वैदिकांचा गूढ अभिप्राय आहे.

इस्लामी संस्कृति । ७