पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



क्षणभर हुरळलेले कुरेश आतां अधिकच चेकाळले. मुहंमदांची स्वतःच्या दैवी प्रेरणेवर श्रद्धा होती. हळूहळू त्यांची शिकवण रुजत होती. सत्याचें बीज आज ना उद्यां अंकुरल्याशिवाय कसें राहील? वाळवंटांतील अरब व इतर व्यापारी मक्केच्या यात्रेस येत. पैगंबरांची वाणी ते ऐकत. पैगंबरांच्या आत्म्याचें निर्मळ व तेजस्वी असें प्रकटीकरण ऐकत. ती वाणी ऐकून ते थक्क होत. परत जातांना तो नव संदेश, तो नव प्रकाश घेऊन ते जात. नव जीवन घेऊन जात. शत्रूच्या उपहासानें, निंदाप्रचुर काव्यांनी मुहंमदांची शिकवण अधिकच सर्वांना माहित झाली. ही वाढती कीर्ति, हा वाढता प्रसार कुरेश कसा सहन करतील. "तुमच्या पुतण्याची ही वटवट बंद करा." असें चुलते अबु तालिब यांचेकडे येऊन कुरेश सांगत. मुंहंमदांचे मूर्तिपूजेवरील व खोट्या धर्मावरील हल्ले अधिकच तीव्र होऊं लागले. काबाच्या जागेत ते प्रवचने देत. तेथून त्यांना हांकलून देण्यांत आले. एके दिवशीं सारे कुरेश संतापून अबु तालिबांकडे आले व म्हणाले, "तुमच्या पिकल्या केसांना आम्ही मान देतो. तुमचें स्थानहि उच्च आहे. परंतु तुमच्याविषयीं असणाऱ्या आदरालाहि कांहीं सीमा आहे. आमच्या देवदेवतांची निंदा तुमच्या पुतण्यानें सतत चालविली आहे. किती दिवस हें आम्ही सहन करावें? आमच्या पूर्वजांचीहि तो नालस्ती करतो. ते मूर्ख होते असें म्हणतो. तुम्ही हैं बंद करवा. नाहींतर उघड त्याची बाजू घ्या. म्हणजे तुमच्याशीहि मग आम्हांला लढतां येईल. परंतु सध्यांच्या तुमच्या दुटप्पी
७४ ।