पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धोरणानें आम्हांला कांहीं करतां येत नाहीं. एक तर त्याचे व्हा, नाहींतर आमचे व्हा. मग लढाई करूं. कोणाचं तरी एकाचें निर्मूलन होईल." असें म्हणून ते गेले. वृद्ध अबु तालिबांच्या मनाची स्थिति केविलवाणी झाली होती. आपल्या लोकांपासून वियुक्त होणें हेंहि कठिण आणि निर्दोष पुतण्याला मूर्तिपूजकांच्या हातीं सांपविणें हेंहि कठिण. काय करावें? वृद्धानें मुहंमदांस बोलाविलें, मुहंमद नम्रपणे परंतु निश्चयानें बसले. चुलते म्हणाले, "हें पहा मुहंमद, सोड हा नाद. तूं मलाहि वांचव व स्वतःलाहि वांचव बेटा, मला झेंपणार नाहीं इतका बोजा माझ्यावर नको घालू."
 मुहंमद अभंग निश्चयानें म्हणाले, "काका, माझ्या उजव्या हातावर सूर्य व डाव्या हातावर चंद्र ठेवून, मला स्वीकृत कार्यापासून ते परावृत्त करूं पाहतील तरीहि तें शक्य होणार नाहीं. मी मरेन, तेव्हांच माझे कार्य थांबेल!"
 आपल्या चुलत्यांना सोडावे लागेल या विचाराने हे शब्द बोलल्यावर त्यांचे हृदय भरून आले. ते एकदम उठले. भावना लपवण्यासाठी निघाले. परंतु वृद्ध चुलत्याने पुन्हां हांक मारली व ते म्हणाले, "मुहंमद, शांत मनानें जा. ज्यांत तुझ्या आत्म्यास आनंद आहे ते सांगत जा. ईश्वराची शपथ मी तुला कधींहि सोडणार नाहीं, त्यांच्या हातांत देणार नाही." आणि तदनंतर वृद्ध अबु तालिब यांनीं बनी हाशिम व बनी मुत्तलिब या घराण्यांतील सर्वांना बोलावून सांगितलें, "मुहंमदांची तुम्ही सारे बाजू घ्या. त्याच्या वतीने उभे रहा." सर्वांनीं ऐकलं व तदनुसार करण्याचे ठरविलें. फक्त अबु लहब विरुद्ध बाजूला गेला. 'आगीचा बाप' असें त्याला इस्लामी इतिहासांत टोपण नांव मिळाले आहे.
 चौथ्या वर्षी मुहंमद अल अरकमच्या घरी राहायला गेले. तें घर मध्यवर्ती होतं. यात्रेला येणारे जाणारे तेथे भेटत. या अल अरकमच्याच घरामागें एकदां कुराण ऐकत असतां मुसब इब्न उमायर हा मुस्लीम झाला होता. तो आपल्या आईचा व जमातीचा लाडका होता. परंतु तो मुस्लीम झालेला पाहून तें प्रेम गेलें! ते त्याचा छळ करूं लागले. तो अबिसिनियांत जाणाऱ्यांपैकीं एक होता. अल अरकमच्या घरीं मुहंमदास मुसबची आठवण येई.
 परंतु याच वेळेस मुहमदास एक मोठी जोड मिळाली ती म्हणजे उमरची. उमरचें नांव इस्लामी इतिहासांत अति विख्यात आहे. उमरचे वडील मुहंमदांच्या

इस्लामी संस्कृति । ७५