पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुनःपुन्हां त्यानें तो कागद वाचला. आणि म्हणाला, "मलाहि घ्या तुमच्या धर्मात मुहंमदाकडे मला न्या. तुमचा धर्म मी स्वीकारला, असे त्यांना सांगू दे."
 उमरनें मुहंमदांच्या हातांचं चुंबन घेतलें. नंतर तो म्हणाला, "मलाहि तुमच्या संघांत सामील करा." सर्वांना आनंद झाला. सर्वांनीं प्रार्थना केली व सर्वांनीं प्रभूचे आभार मानले.
 हा धर्म अतःपर अंधारांत राहिला नाहीं. मुहंमदांच्या भोंवतीं आतां केवळ खालच्या दर्जाचेच लोक नव्हते तर बुद्धिमान, शूर, उत्साही अशीं माणसें त्यांच्या झेंड्याखालीं होतीं. हमजा, अबूबकर, उमर अशीं मातबर व शूर माणसें त्यांच्या धर्मांत होती. अलि तर होताच. तो फार मोठ्या पदवीस चढत होता. उच्च वृत्तीचा होत होता. हमजा, तल्हा, उमर यांच्यासारखे तरवारबहादूर थोडेच असतील!
 हे नवधर्माचे लोक, हे मुस्लीम आतां उघडपणें उघड्यावर प्रार्थना करूं लागले. उमरनें नवधर्म स्वीकारतांच कुरेशांना अंगावर वीज पडल्यासारखें झाले! निर्णायक प्रहार करण्यासाठी ते संधि पहात होते. अबिसिनियांतील शिष्टमंडळहि हात हलवीत परत आलें होतें. प्रखर उपाय योजावे असें कुरेश म्हणू लागले. शेवटी इ. स. ६१६ मध्ये मुहमदांच्या मिशनच्या सातव्या वर्षी कुरेशांनी हाशिम व मुत्तलिब यांच्या घराण्यांवर बहिष्कार घातला. हाशिम व मुत्तलिब यांच्या घराण्यांशी कोणीहि रोटीबेटी व्यवहार करू नये, त्यांच्याशीं सौदा विक्री देवघेव करूं नये, असा करार लिहून काबामंदिरांत त्यांनी ठेवला.
 हाशिमी व मुत्तलिब मंडळी शहरभर विस्कळितपणे बसलेली होती. ते सारे अबु तालिबांच्या मोहल्ल्यांत रहायला आले. मक्केच्या पूर्वेस पर्वतांच्या अरुंद घळींत ही जागा होती. हा भाग भिंती व प्रचंड फत्तर यांमुळे शहरापासून जसा कांहीं अलग झालेला होता. या भागांत यायला व बाहेर पडायला एकच लहान दरवाजा होता. या घराण्यांतील अबुलहव तेवढा शत्रूकडे गेला.
 तीन वर्षे अशा बहिष्कृत स्थितींत गेलीं. धान्याचे संचय संपत आले. हाशिमी व मुत्तलिबी सारे मरणार का? भुकेलेल्या मुलांच्या आरोळ्या कानांवर येत. कांहीं दयाळू लोक चोरून धान्य वगैरे पाठवीत. मिशनच्या या सातव्या वर्षी मक्केत

इस्लामी संस्कृति । ७७