या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मरण हा तर फारच दारुण आघात होता. ज्या वेळेस सर्वत्र शंका व संशय होते, मुहंमदाचाहि स्वतःवर विश्वास नव्हता, सर्वत्र अंधार व निराशा यांचें राज्य होते, अशा वेळेस तिच्या प्रेमानेच मुंहमदास आधार दिला. त्यांच्या आशेची व सांत्वनाची ती देवता होती. मरेपर्यंत खदिजेची प्रेमळ आठवण मुहंमदास होती. अतिहळुवार प्रेमानें ते तिचा उल्लेख करीत.
या दोघांच्या मरणानं मुहंमद जसे उघडे पडले! त्यांना खूप वाईट वाटलें. इस्लामी इतिहासांत हें शोकाचं वर्ष. सुतकी वर्ष म्हणून प्रसिध्द आहे. अबु तालिब मेल्यावर विरोधकांचा रस्ता मोकळा झाला. आतांपर्यंत ते थोडी मर्यादा पाळीत होते. अतःपर मर्यादा पाळण्याची जरूरच उरली नाहीं. त्यांनीं हा इस्लामी धर्म- हा नवधर्म समूळ नष्ट करण्याचे ठरविलें.
回 回 回
इस्लामी संस्कृति । ७९