मुहंमद जरा कष्टी होते. मक्का सोडून अन्यत्र जावें असेंहि त्यांच्या मनांत येऊं लागलें. मक्केने माझा त्याग केला तरी इतरत्र का कोठें माझें स्वागत होणार नाहीं ? एके दिवशीं झैदला बरोबर घेऊन ते ताइफ या शहरी गेले. त्यांनी तेथील लोकांस नवधर्म सांगितला. परंतु ते लोक हा नवधर्म ऐकून संतापले. "परंपरेच्या विरुध्द सांगणारा हा कोण आला, हांकला त्याला. मारा दगड. अशा गर्जना झाल्या. त्यांनी झैद व मुहंमद यांना गांवाबाहेर घालवले. दुष्ट लोक तर संध्याकाळ होईपर्यंत त्यांच्या पाठोपाठ दगड मारीत जात होते. मुहंमद घायाळ झाले होते. रक्तबंबाळ झाले होते. ते थकले, गळून गेले. एका झाडाखालीं बसून प्रार्थना करूं लागले. आकाशाकडे हात पसरून ते म्हणाले, "प्रभो, मी दुबळा आहे म्हणून तक्रार करीत आहे. माझ्या इच्छांच्या पोकळपणामुळे मी प्रार्थना करीत आहे. लोकांच्या दृष्टीनें मी तुच्छ आहें. हे परम दयाळा, दुर्बळांच्या बळा, तूं माझा प्रभु, तूं आधार. तूं नको हो मला सोडूं. मला परकीयांचे भक्ष्य नको करूं. माझ्या शत्रूंच्या तावडींत मला नको हो देऊं तुझा माझ्यावर जर राग नसेल तर मी सुरक्षित आहे. तुझ्या मुखचंद्राचा प्रकाश हाच माझा आधार. तुझ्या मुखप्रकाशानें माझा सारा अंधार नष्ट होतो. या जगीं व परलोकीं शांति मिळते. तुझा क्रोध माझ्यावर न उतरो देवा, माझ्या अडचणी सोडव. तुझी इच्छा असेल त्याप्रमाणें या अडचणी निस्तर. तूंच माझी शक्ति. तूंच आधार. तुझ्याशिवाय ना आधार, ना बळ.
८० ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/९४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे