पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य



 हिंदी समाजाच्या साम्राज्यविरोधी राजकारणाचें माक्र्सवादी पृथक्करण रॉय यांनीं प्रथमतः इ.स. १९२२ सालीं सुरू केलें. त्याचा प्रभाव इ. स. १९३४ सालापासून येथील राष्ट्रीय सभेंत दिसूं लागला. घटनासमितीच्या राजकारणाचा सिद्धांत रॉय यांनीं हिंदी राजकीय विचारसरणींत प्रथमतः उतरविला. प्रथमतः फार जोराचा प्रतिकार येथील क्रांतिकारकांनी केला. पण आतां राष्ट्रीय सभेनें या तत्त्वाचा सार्वत्रिक अंगिकार केलेला दिसतो.
 श्री. रॉय यांनीं 'India, in Transition ' या १९२२ सालीं लिहिलेल्या पुस्तकांत ब्रिटिशांच्या स्थापनेपासून तों महायुद्धोत्तर कालापर्यंतच्या हिंदी सम्राज्याच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरांचा उलगडा मार्क्सवादी शास्त्रीय दृष्टीनें, आधुनिक इतिहासशास्त्राच्या विवेचक पद्धतीचें अवलंबन करून, केला आहे; हिंदुस्थानांतील निरनिराळ्या राजकीय व सामाजिक चळवळींचेंन व विचारांचें पृथक्करण करून ब्रिटिश साम्राज्यशाहीची, प्रागतिक सुधारकांची, सनातनी पण जहाल राष्ट्रवाद्यांची, मुसलमानी राजकारणाची आणि गांधीवादाची शास्त्रीय मीमांसा केली आहे, व या सर्वांची हिंदी समाजाच्या प्रगतींत व राजकारणांत स्थानें व मर्यादा सांगितल्या आहेत; ब्रिटिश साम्राज्यास अनुकूल असलेले व प्रतिकूल असलेले व अधांतरीं लोंबकळणारे हिंदी-समाजसंस्थेतले वर्ग कोणते, हे दाखविले आहे. 'परकीय साम्राज्याचा नाश व हिंदी राष्ट्रीय क्रांति' या ध्येयाकडे जाण्यास लागणारी विचारसरणी कशा प्रकारची असावयास पाहिजे याचे सम्यक् विवेचन रॉय यांनी या पुस्तकांत केलें आहे. या पुस्तकाशिवाय या विषयावर रॉय यांनीं अनेक लेख, प्रबंध व पुस्तकें आतांपर्यंत प्रसिद्ध केलीं आहेत. Future Politics of India,our Task in India, Maniphesto इत्यादि पुस्तकें त्यांच्या प्रगल्भ राजकीय विचारांची साक्ष देतात. हिंदी राजकीय चळवळीचें माक्र्सवादी विवेचन करतांना त्यांनी आपले विचार अनेकदा बदलले. ही गोष्ट त्यांच्या

१२