पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

४१



करण्याने प्रसन्न होतो; मानवांची सेवा व त्यांचे कल्याण हीच मनुष्याची इतिकर्तव्यता आहे. असें प्रत्येक मुस्लिमाने समजले पाहिजे. हाच अर्थ ' ला इलाहा इल्ललाह ' मध्ये ध्वनित केला आहे. त्याचप्रमाणे हजरत मुहम्मद हे परमेश्वराने पृथ्वीवर पाठविलेले पैगंबर असल्यामुळे त्यांनी मानवांच्या उद्धाराची जी शिकवण दिली आहे ती पूर्णपणे अंमलात आणणे हे आपलें परम कर्तव्य आहे असे मुस्लिम म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मानले पाहिजे. या गोष्टी आपण केल्या तरच इस्लाम धर्मावर आपली खरी श्रद्धा आहे हे सिद्ध होईल. नुसता कलिमा तोंडाने म्हणून त्याचा उपयोग नाही. त्यामध्ये वर प्रदर्शित केलेला जो अर्थ आहे तो प्रत्यक्ष अंमलांत आणण्याचा प्रयत्न करूं तरच 'कलिमा' पढल्याचे खरें श्रेय मिळणार आहे. या दृष्टीने इस्लाम धर्माचा पहिला आधारस्तंभ कलिमा पठण किंवा धर्मावरील श्रद्धेचे निवेदन किती महत्त्वाचे आहे याची आपणांस कल्पना येईल.

नमाज


 सर्व शक्तिमान परमेश्वराची सतत आठवण राहावी या हेतूनें दिवसांतून पांच वेळां प्रत्येकानें नमाज (प्रार्थना ) आदा केली पाहिजे, अशी इस्लाम धर्माची आज्ञा आहे. 'परमेश्वराचे जे उदात्त गुण आहेत त्यांमध्ये तद्रूप व्हा.' या इस्लामच्या आदेशाचे विस्मरण होऊ नये म्हणून प्रार्थनेची आवश्यकता प्रतिपादली आहे. सर्योदयापूर्वी, दोन प्रहरी, तिसऱ्या प्रहरी, संध्याकाळी व रात्री अशा पांच वेळां प्रार्थनेकरितां नियुक्त करण्यांत आल्या आहेत. मध्यरात्री जी प्रार्थना करण्यांत येते, तिला तहाज्जुद ' असें नांव आहे. ही प्रार्थना करावीच असा आग्रह नाही. ज्यांना शक्य होईल त्यांनी