पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/42

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राथमिक शिक्षणाचे यक्षप्रश्न

 ‘युनिसेफ' ही बालकल्याणास वाहन घेतलेली आंतरराष्ट्रीय संस्था. ती प्रतिवर्षी जगातील बालकांची सद्यःस्थिती चित्रित करणारा एक अहवाल प्रकाशित करीत असते. 'The State of World Children' या नावाने प्रकाशित होणारा १९९९ चा अहवाल ‘युनिसेफ'ने शिक्षणावर केंद्रित केला आहे. बालकांच्या प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या उपेक्षेबद्दल त्यात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगभर बालकांचे जे अनेक हक्क मान्य करण्यात आले आहेत, त्यांत शिक्षणाचाही अंतर्भाव आहे. बालकांच्या प्राथमिक शिक्षणविषयक मूलभूत मानव अधिकाराची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याबद्दल जी कारणे अहवालात नमूद करण्यात आली आहेत, ती लक्षात घेता या विषयाचे महत्त्व स्पष्ट होते.
 (१) शिक्षण हा मूलभूत मानवाधिकार होय. (२) शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन होय. (३) दारिद्र्याशी संघर्ष करण्याचे शिक्षण हे प्रभावी हत्यार आहे. (४) स्त्रियांच्या सबलीकरणाचे (Empowerment) शिक्षण साधन होय. (५) मुलांना शोषण, कष्ट, यातना, लैंगिक अत्याचारांपासून वाचविण्याचे शिक्षण हे माध्यम होय. (६) शिक्षण हे लोकशाही बळकट करण्याचा मंत्र आहे. (७) सामाजिक पर्यावरण सुरक्षित ठेवणारा रक्षक म्हणजे शिक्षक होय. (८) शिक्षण लोकसंख्या नियमनाचा प्रभावी घटक होय.

 यासाठी स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणात क्रांती, मानव संसाधन विकासाद्वारे प्रयत्न करण्याचे आवाहन अहवालात करण्यात आले आहे. जगातील १३० दशलक्ष मुले प्राथमिक

एकविसाव्या शतकातील शिक्षण/४१