पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालकांचे संगोपन व शिक्षण हे एक सामाजिक आवाहन आहे. त्यामुळे बालशिक्षणाचा अभ्यास करीत असताना त्यांच्या संगोपन व शिक्षणाचा अभ्यास वेगळ्या सामाजिक संदर्भात करावा लागतो.

 नित्याच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनात ० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना 'बालक' संबोधण्यात येते. त्यांच्या विकासाच्या विभिन्न अवस्था आहेत.

 १.   नवजात : जन्मापासून १ महिन्यापर्यंत
 २. अर्भक : महिना ते १ वर्षांपर्यंत
 ३. अर्भकोत्तर   : वर्ष ते २ वर्षांपर्यंत
 ४. शैशव : २ ते ५ वर्षांपर्यंत
 ५. बालक : ५ ते १० वर्षे (मुली)
५ ते १२ वर्षे (मुले)
 ६. कुमार : १० ते १२ वर्षे (मुली)
१० ते १४ वर्षे (मुले)
 ७. किशोर : १२ ते १८ वर्षे (मुली)
१४ ते २० वर्षे (मुले)

 विकासाच्या या विभिन्न अवस्थांतून जात असताना बालकांना विशेष संरक्षण, काळजी, जपणूक, संगोपन इत्यादींची गरज असते. ज्या काळात बालकांची विशेष काळजी घ्यायची नेमक्या त्याच काळात त्यांच्याकडे विविध कारणांमुळे दुर्लक्ष होते. बालकांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष हा जागतिक स्तरावर काळजीचा विषय झाला आहे. हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० नोव्हेंबर, १९५९ रोजी बालकांचे मूलभूत हक्क निश्चित करणारा एक जाहीरनामा प्रस्तुत केला. त्याला ‘बालक हक्कांचा जाहीरनामा' असे संबोधण्यात येते. या जाहीरनाम्यास जगातील सर्व देशांनी मान्यता दिली आहे. बालकांच्या संगोपन व शिक्षणविषयक गरजांचे विवेचन करणारा हा जाहीरनामा बालक शिक्षणाचा विचार करीत असताना आवर्जून लक्षात घ्यायला हवा. जगातील सर्व बालकांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध करावे, हा या जाहीरनाम्याचा मुख्य हेतू आहे. मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणेत प्रत्येक मनुष्य हा सर्व हक्क व स्वातंत्र्ये मिळविण्यास पात्र आहे. तद्वतच बालकही. बालकाला समृद्ध बालपण लाभावे. स्वतःसाठी तसेच समाजाच्या भल्यासाठी त्याला सर्व अधिकार व स्वातंत्र्य उपलब्ध

एकविसाव्या शतकातील शिक्षण/५८