पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/66

हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थांनी फार मोठे प्रबोधन कार्य केले असले तरी अशा संस्थांचा प्रचार न झाल्याने अनेक अपंग शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.
 या ठिकाणी अपंग म्हणजे अस्थिव्यंग असलेले. इतक्या मर्यादित स्वरूपाची ‘अपंग' संज्ञा इथे प्रयोगित करण्यात आली आहे. शारीरिक अपंगत्वावर मात करणं हा या बालकांच्या शिक्षणाचा प्रमुख हेतू असतो. लुळे, पांगळे, लंगडे, कुबड आलेले, हात-बोटे नसलेले, असल्यास वेडेवाकडे, आखूड असलेल्या, ठेंगणे इ. सर्वांचा अंतर्भाव शारीरिक अपंगांमध्ये होतो. हे अपंगत्व मुख्यतः अस्थिव्यंगामुळे निर्माण होते. काही बाबतींत ते अपघात इत्यादींमुळेही निर्माण होते. या व्यंगामुळे शारीरिक अपंगत्व आलेल्या बालकांच्या क्रिया-प्रतिक्रियांवर साहजिकच मर्यादा येतात. त्यामुळे कृतिशील बालकांच्या शिक्षणास अथवा सहजकौशल्यास पारखी असलेली मुले ही त्यांच्या औपचारिक शिक्षणात सर्वसामान्य मुलांइतकी प्रगती करू शकत नाहीत. अशा बालकांना तीन चाकी सायकली, कुबड्या, जयपूर फूट इत्यादी विविध साधनं देऊन, त्यांना स्वावलंबी बनवून सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो. खेळासारखे प्रभावी माध्यम वापरून त्यांना परिणामकारकपणे शिकवता येते. कपडे घालणे, अंघोळ करणे, जेवणे, उचलणे, पळणे, टंकलेखन करणे, लिहिणे, सायकल चालविणे इत्यादी कितीतरी क्रिया अशा आहेत की, त्या अपंगांना सहजतेने करता येत नाहीत. या क्रिया त्यांना सुलभपणे करता याव्यात म्हणून विविध त-हेची ३०० साधने विकसित करण्यात आली आहेत; पण याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. अंधाप्रमाणेच प्रत्येक अपंग बालकाचे व्यंग व मर्यादा लक्षात घेऊन त्याला शिकवणे क्रमप्राप्त असते. अपंगांच्या शिक्षणाची पद्धती व्यक्तिपरत्वे भिन्न असल्याने अशा बालकांना शिकविणा-या शिक्षकांना नित्य प्रयोगशील व सर्जनशील राहावे लागते. अपंगांसाठी स्वतंत्र शाळा विकसित करण्यात आल्या आहेत; पण अस्थिव्यंग अपंगांचा खरा प्रश्न त्यांच्या शारीरिक मर्यादेचा असतो. त्यावर मात करून त्यांना औपचारिक शिक्षण देणे शक्य असतं. अशा बालकांचा न्यूनगंड कमी करून त्यांच्यात विश्वास वाढविण्याचा प्रयत्न करणं हे अपंगांना शिकविणा-या शिक्षकाचे प्रमुख कार्य असतं. सामाजिक मन, दुर्बलांविषयी कणव असलेले, त्यागी व समर्पित शिक्षकच अपंग बालकांच्या शिक्षणाचे कार्य अधिक परिणामकारकपणे करू शकतात.

 जन्मतः किंवा अपघात, आजाराने हात, पाय कंबर, पाठ, मान इत्यादी अवयव निकामी झाल्याने अपंग कमजोर होतात. शिक्षण हे त्यांना वरदान ठरणारं असले तरी औपचारिक शिक्षण घेतल्यावर त्यांच्यावर मर्यादा येतात.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/६५