पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/107

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुविधांचा विस्तार झाल्यामुळे हा परिणाम वाडी, वस्ती, गाव, शहर नि महानगर असा सार्वत्रिक दिसून येतो. गाव व शहरांचे होणारे एकीकरण व त्यातील रोज संपणारे अंतर यामुळे बदल व परिणामांची गती चक्रावून सोडणारी आहे. उत्पादक मनुष्यबळाची घट व निष्क्रिय शिक्षित आणि बेरोजगारांची वाढती फौज येत्या काळात भारताची खरी समस्या ठरेल असे एक सामाजिक कार्यकर्ता व संवेदनशील नागरिक म्हणून माझे स्थूल निरीक्षण आहे. त्यातच स्त्री शिक्षण, नोकरी व व्यवसाय यामुळे, भारतीय कुटुंब व समाज जीवनावरील स्त्रियांच्या वाढत्या सक्षम व स्वकेंद्रित प्रभावामुळे, विकासामुळे निर्णयाचे होकायंत्र मुले व स्त्रियांकडे झुकते आहे. पुरुषांची वाढती निष्क्रियता, व्यसनाधीनता, कार्यक्षमतेचा संकोच ही त्यामागची खरी कारणे होत.
 घरबांधणी, वाहन खरेदी, नोकरदार वर्गांचे वाढते वेतनमान, घरांना येणारे यंत्रघराचे स्वरूप (टी.व्ही. वॉशिंग मशिन्स, मिक्सर, फ्रीज, व्हॅक्यूम क्लिनर्स, म्युझिक सिस्टिम्स, होम थिएटर्स, संगणक इ.) यामुळे वरकरणी भौतिक संपन्न दिसणारा समाज व कुटुंबे कर्जाच्या फुगवट्यावर फोफावत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. परिणामी कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य व स्वस्थता हरवली आहे. देवळा, मंदिरात वाढत जाणारी गर्दी माणसाच्या मानसिक अनारोग्याचे तर लक्षण आहेच, पण ते त्यांच्या आर्थिक असाह्यतेचे अपत्य आहे. बाबा, बुवांची चॅनल्स काय सांगतात? ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी' ची वाढती मानसिकता माणसास पराधीन करून निष्क्रिय व निरुपयोगी करते आहे, हे आपल्या लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते.

 कुटुंबातील असंवाद, परस्पर अविश्वास, मुलांच्या वाढी, विकासातून माणसाची गुंतवणूक रोज कमी होणं यात परस्परांबद्दलचा स्नेहभाव, सहवास, साहचर्य इ. चा संकोच होतो आहे. कुटुंबातील विसंवाद हा राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरावा अशी स्थिती आहे. 'दिलं की संपलं' अशा मानसिकतेमुळे पालक पुरवठादार व पाल्य निराधार होत आहेत. पाल्याची फी, पोषाख, दफ्तर, प्रवेश, क्लास, कॅप, सहल इ. गरजा भागवल्या - पाचच्या जागी पंचवीस दिले की संपले ही मानसिकता घरोघरी अनाथाश्रम निर्माण करणारी ठरत आहे. गाव आणि शहरात व्यवसाय, उपजीविका, कामे इ. मुळे प्रवासात वाढणारा वेळ मुलांतील आई-वडिलांच्या वेळेची गुंतवणूक आटवत निघाला आहे. तीच गोष्ट शिक्षकांची. 'शिकवलं की संपलं' च्या मानसिक धारणेमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील शिक्षकांची भागीदारी शून्याकडे झुकत आहे. रेकॉर्ड डान्स, सी.डी.ज. गाइडस्, क्लासेस यामुळे शिक्षकांची

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१०६