पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/111

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण जपानमध्ये त्सुनामी आली म्हणून मात्र गळा काढायचा असा विसंगत अमानुषवाद जोपासणारी नवी संस्कृती... तिनं रेशमी किड्याप्रमाणे स्वतःभोवती एक आभासी जग (Virtual World) तयार केलंय. त्यात ते स्मरणरंजन करत न खाता-पिता समृद्धी किंवा निराशेच्या नशेत जगू पाहात आहेत. व्यक्तिवाद, मुक्त अर्थव्यवस्था, लोकशाही, पर्याय निवडीचे स्वातंत्र्य, बदल स्वीकारण्याची उदारता व लवचिकता, मतभेद सहन करण्याची क्षमता इ. पाश्चात्त्य जीवनमूल्ये त्यांच्या जगण्याचे आधार होत. या समुदायाचे लोक एकाच वेळी स्थानिक असतात नि वैश्विकही. पाय जमिनीवर व मन जगभर भिरभिरणारं असं विभाजित व्यक्तिमत्त्व घेऊन जगणाच्या नवश्रीमंत मध्यमवर्गीयांनी जन्म दिलेली पिढी- त्यांची मुलं तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्मतात. घर खेळण्यांचं, बुटाचं, पुस्तकाचं, वस्तूंचं दुकान थाटणारी ही पिढी. भौतिकसंपन्न पण बंधशून्य. पुढे बंधनशून्य होऊ घातलेली!
 ही नवश्रीमंत, उच्चशिक्षित, पॅकेज पेरेंट होणारी पिढी... त्यांचं दीर्घकाळ शिकत राहणं, नोकरी, व्यवसायात पोझिशन मिळवायच्या महत्त्वाकांक्षेत लग्न करायचं राहून गेलेली (आणि पहिल्या ऋतूचं दशक गमावलेली!)... लग्न उशिरा, मुलं उशिरा त्यामुळे ओढाळ पालक होणा-यांची मुलं लाडाकोडात वाढतात. त्यासाठी तर असतो सारा आटापिटा नि अट्टाहास! तिशीच्या घरात ज्यांना मुलं होतात... ती मिळवती, शिकती होण्यापूर्वी पालक स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसलेले असतात. त्यांना ना स्वतःची फिकीर ना मुलांची। ‘मुलांसाठी ठेवलं की संपलं' असा पालकत्वाचा नवा फंडा. उशिरा लग्न व पालकत्वामुळे काल तरुण असलेले... मुलं होताच मनाने म्हातारे होताना दिसतात. ही एक नवीच सामाजिक समस्या... जागतिकीकरणातून आलेली.

 जागतिकीकरणाने भारतात दोन प्रकारचे पालक निर्माण केलेत. एक शहरी, शिक्षित, गलेलठ्ठ पगारवाले, विदेशागमन केलेले, बहुसंस्कृतीसंपन्न, ते व्यक्तिमत्त्व विकासासाठी दशकभराचा काळ तरी घेतात. त्यातली पहिली पाच वर्षे शिक्षणासाठी व नंतरची पाच वर्षे नोकरी व्यवसायात स्थिरावण्यासाठी. या काळात ते स्वतः जाणून घेऊन विकसित होत राहतात. एक्सचेंज ऑफ आयडिया, एक्सचेंज ऑफ आयडियल्स, सर्च ऑफ आयडेंटीटीच्या नादात विवाहपूर्व संबंध, प्रेम, सहवास, प्रवास यानंतर होणारा विवाह एक औपचारिकता असते. याउलट खेड्यात तारुण्य कळण्यापूर्वी शिक्षण संपणं, पोरवयात नोकरी-विवाह, अजाणतेपणी अपत्य... दोन्ही स्तरावर अकाली प्रौढत्व. शहरी प्रौढत्व जीवन संघर्षाचा भाग. ग्रामीण प्रौढत्व परिस्थितीचा

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११०