पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/117

हे पान प्रमाणित केलेले आहे.

यंत्रघर होणं नि माणसाचं रोबो होणं ओघानं आलंच. अल्पवयात मुलामुलींचे गैरवर्तन, चोच्या, प्रेमसंबंध, आत्महत्या, पलायन, फसवणूक इ. प्रश्न कुटुंबस्वास्थ्य व सुरक्षितता गमवत आहे.
 जागतिकीकरणामुळे कुटुंब व मुले यांच्या संदर्भात संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, वर्तन, आधुनिकीकरण, आरोग्य, दळणवळण, व्यक्तिमत्त्व विकास, पुनर्वसन, उपजीविका, विषमता, अर्थोत्पादन इ. अनेक प्रश्न व त्यांचे स्वरूप रोज अधिक विक्राळ व गडद होत आहे. जागतिकीकरणाच्या पहिल्या दशकानंतर भारताने एकविसाव्या शतकात प्रवेश केला. या शतकाचा म्हणून मोठा परिणाम समाजजीवनावर व मुख्यतः कुटुंब, पालक, मुले यांच्या व्यक्तिगत नि सामाजिक भविष्यावर होताना दिसतो. जागतिकीकरणाबरोबरच या शतकाच्या आगमनाने होणारे बदल व परिणाम अभ्यासणे तितकेच महत्त्वाचे आहे.
एकविसाव्या शतकाची आव्हाने
 जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण, नागरीकरण, औद्योगिकरण, माहिती व तंत्रज्ञान विकास यांच्या पाश्र्वभूमीवर एकविसाव्या शतकाचा उदय झाला. त्यालाही दशक उलटून गेले. या काळात भौतिक संपन्नता सकृतदर्शनी जरी दिसू लागली असली तरी समाजवास्तव विपरीत आहे. समाजात आर्थिक सुबत्ता वाढते आहे. पण त्या सुबत्तेचे केंद्रीकरणही होत आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. इथं असणारी भौतिक संपन्नता, व्यापारी, उद्योगपती, मोठे पगार मिळविणारे सीईओ, सनदी व्यापारी, एन.आर.आय., प्राध्यापक, राजपत्रित अधिकारी, शिक्षक, व्यावसायिक, नोकरदार यांच्या स्तरावर दिसून येते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, निम्न मध्यमवर्गीय, मजूर, कामगार, आदिवासी, शेतमजूर, झोपडपट्टीतील रहिवासी असा जो समाजाचा मोठा वर्ग आहे त्यांचे अर्थमान घसरत आहे. जगण्याचा त्यांचा संघर्ष रोज भीषण होत आहे. मूठभर अब्जाधीश व असंख्य दारिद्र्यरेषेवरील हे विषम चित्र समाजाचे खरे चित्र असल्याने बहुसंख्य कुटुंबे व त्यांच्या पाल्यांवरील ताण एकविसाव्या शतकात वाढतो आहे.

 मध्यवर्गाची उच्चवर्गीय होण्याची धडपड एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकानंतर अधिक गतिमान बनल्याचे दिसून येते. सहावा वेतन आयोग, चढती पॅकेजीस, ही त्याची प्रमुख कारणे असली तरी एकंदरच समाजाचे उत्पन्न वाढते आहे. महागाईचा फटका बसतो तो निम्नमध्यवर्गीय व दारिद्ररेषेखालील वर्गास. वेतन वाढते त्या प्रमाणात रोजंदारीवरील मजूर, कामगार यांची मजुरी वाढत नाही. त्यांच्या गरजा वाढतात पण महागाईपुढे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११६