पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/126

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. शाळा व शिक्षण स्वायत्त होणे हा मुलांचे प्रश्न सोडविण्याचा खरा उपाय होय. त्यासाठी शिक्षक, पालक संघटना जागृत व मजबूत हव्यात. विदेशात शाळेतील वर्गात एक मुलगा क्षमतेपेक्षा अधिक भरला तर पालक, शिक्षक ओरड करतात. आपण समाज शिक्षणाच्या (Mass Education) नावाखाली झुंड शिक्षण (Mob Education) देत आहोत. झुंड अनियंत्रित असते, तशी ती लक्ष्यहीनही असते, हे लक्षात घेतले की शिक्षण संघटन शिस्तीचे व हस्तक्षेपमुक्त का हवे ते पटल्याशिवाय राहणार नाही. जीवन शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
नागरिकता विकास

 विदेशातून आपण भारतात येतो तेव्हा प्रकर्षाने आपल्या एक गोष्ट लक्षात येते की समाज शिक्षण, नागरी शिक्षण, सार्वजनिक शिस्त इ. गोष्टींचा अभाव आपल्या शिक्षणात आहे. आपण गर्दीत व घाणीत राहतो हे लोकसंख्येने विरळ व लोकशिक्षणाने समृद्ध देश पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही. चॉकलेट खाऊन कागद टाकणे, उकिरडे भरून वाहणे, गटारे तुंबलेली असणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची अस्वच्छता व दुर्गंधी, रस्त्यांवर व जिन्या, खोल्यांच्या कोप-यात भुंकणे, रहदारीचे नियम न पाळणे, दुचाकी वाहनांवर तीन चार जणांनी स्वार होणे, रिक्षात सहाजणांनी बसणे, छोट्या कारणांसाठी लाच देणे, ओळी व नियमांचे पालन न करणे, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी सेवाभावी व कर्तव्यभावनेनं काम न करणे, अडवणुकीचे धोरण, अशिष्ट बोलणे व व्यवहार करणे, स्त्री, वृद्ध, बालक दाक्षिण्याचा अभाव, सर्रास खोटे बोलणे, स्वावलंबनाचा अभाव, सरंजामी वृत्ती, लांगूलचालन किती गोष्टी सांगायच्या? जपानी कार्यसंस्कृत, चिनी कष्टाळू, युरोपियन शिस्तीचे असं राष्ट्रीय चरित्र असलेले हे देश. आपली राष्ट्रीय ओळख काय? याचं उत्तर देता न येण्यातच आपल्या नागरी भानाचे शल्य दडलेले आहे. शालेय शिक्षण जोवर नागरी शिक्षणाचा ध्यास होणार नाही, घरोघरी पालक जोवर जबाबदारीचे वर्तन वस्तुपाठ म्हणून मुलांसमोर ठेवणार नाहीत, तोवर मुलं आपल्यासारखीच वाढणार. मुलं अनुकरणशील असतात. ती निरीक्षणातून अधिक शिकतात. मुलांचं वर्तन सांगण्यापेक्षा आपल्या कृतीपाठातून येते, हे एकदा पक्कं माहीत झालं की वर्तन परिवर्तन आपसूक होते. व्यक्तिगत जीवन व्यवस्थित, पण समाज जीवनात ‘चलता है' ची वृत्ती हे आपल्या विसंगतीचे ठळक उदाहरण होय. घर स्वच्छ मग रस्ता घाण का? ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण' हे जोवर संपणार नाही, तोवर आपल्या देशात कर्तव्यतत्पर व जबाबदार नागरिक निर्माण होणार नाहीत. न

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२५