पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/128

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे. शिक्षणात मुलं वजा होणं, बाल्य (Childhood) उपेक्षित राहणं हा मुलांचा खरा प्रश्न होय.
पालक

 पालकांची शिक्षण व संगोपनातील भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शाळात शिक्षक, पालक, विद्यार्थी असा संयुक्त संघ असायला हवा. आपणाकडे शिक्षक-पालक संघ असतो. बालकहक्कानुसार मुलांना प्राप्त विचार व्यक्त करणे, संगठन करणे, खाजगीपण जपणे, मोकळा वेळ (Leisure) असणे, खेळणे इ. अधिकार पालक, शिक्षक हिरावून घेतात. जन्मदात्या पालकांस मुलांना मारणे, टाकून बोलणे, अपमान करणे इ. चा हक्क नाही. तो शिक्षकांनाही नाही. छडी लागे छम छम, विद्या येई घमघम' चा काळ इतिहासजमा झाला. मुलांना घरी व शाळेत सन्मानाचीच वागणूक मिळायला हवी. जी गोष्ट समुपदेशनाने (Counseling) होते तिथे शिक्षा (Corporal Punishment) का? असा प्रश्न आहे. मुलांचं मन कोवळं असतं. लहानपणी ओढला गेलेला ओरखडा आयुष्यभराचं शल्य असतं. तसंच लहानपणीचे संस्कार ही जीवनभरची शिदोरीही ठरत असते. बाल्य उपेक्षित राहणं, त्यांच्याशी संवाद करायला कोणी नसणं, त्यांचं बालपण एकाकी रहाणं, व्यक्तिमत्त्व विकासास शिक्षणात अवसर न राहणं हे मुलांचे वर्तमानातले कळीचे मुद्दे व प्रश्न आहेत. भौतिक समृद्धीची जागा घर नि शाळातून भावनिक समृद्धी घेईल, तो मुलांसाठी सोन्याचा दिवस ठरेल. समाज व शासनाने आपल्या विचार व व्यवहाराचे सूत्र ‘मूल पहिले' (Child First) असे प्राधान्याचे व महत्त्वाचे बनवले तर बाल्य (Child hood) समृद्ध होईल. मुलांना काय पाहिजे (Want) यापेक्षा मुलांना कशाची गरज (Need) आहे हे सुज्ञ शिक्षक-पालकांनी ठरवलं पाहिजे. हट्ट करतो, पाहिजेच म्हणतो म्हणून त्यांच्या हाती तलवार द्यायची की सुई हे ठरवलंच पाहिजे. तलवार उसवते, सुई शिवते. समाज उद्ध्वस्त करायचा की समन्वित हे पक्क हवं. मुलं चिखलाचा गोळा असतात. कोरी पाटी असतात, हे लक्षात घेऊन पालकांनी आपला विचार व आचार निश्चित करायला हवा. मुलांना आजचं आज दिले तर उद्या त्यांच्या हाती येणार. मुलांच्या बाबतीत संस्कार हे आज नि आत्ताच करायला हवेत. संस्कार देण्यापेक्षा घेतले तर ते चिरंजीव होतात. ज्या पालकांना मुलांना द्यायला वेळ, पैसा, साधने नाहीत त्यांनी मूल जन्माला न घालणे यासारखे शहाणपणाचे दुसरे काम नाही.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२७