पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/137

हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहात नाही हे ध्यानी घेतले पाहिजे. लसीकरणाचं सार्वत्रीकरण झाल्याने सांसर्गिक नि बालरोग मुक्त बाल मानस चिंतामुक्त होते आहे. वस्ती, तांडे, आदिवासी पाडे, झोपडपट्टी सर्वत्र ‘सर्वांसाठी आरोग्य' योजना पोहोचण्यात यश आल्यानं हसरी बाळे सर्वत्र आढळतात. अंगणवाडीतील आहार व शिक्षणाने त्यांना पोलिओ, मुडदूस मुक्त केले तर गाणे, संगीत नाच इ. नी त्यांना डोलायलाही शिकवले.
बाल संगोपन
 भारताची आरोग्य साक्षरता वाढल्याने बालमृत्यू प्रमाण कमी होऊन रोगमुक्त बाल्य बहाल होते आहे. पालकांना स्तनपान, गरोदरपण, कुटुंब नियोजन इ. सुविधांमुळे पालक बाळाला जन्म देण्याची व त्यांचे संगोपन करण्याची प्राथमिक कौशल्ये जाणतात. जन्म ते ६ वर्षांपर्यंत म्हणजे शाळेला जाईपर्यंत घरी समाजात त्यांची पालक व शासन पुरेशी काळजी घेते. त्यामुळे बालमनावर पूर्वी होणारे आघात आज कमी-कमी होत आहेत. बालकांचे मानसिक व भावनिक संतुलन व विकास जागतिकीकरणपूर्व काळापेक्षा अधिक समृद्ध बनले, हे मान्य केले पाहिजे. जिथे कुटुंबात बेबनाव आहे, जगण्याच्या विकोपाचा संघर्ष आहे, कुटुंब अस्थिर आहेत, वस्ती दूर दच्या खोच्या जंगलात आहे, अशा कुटुंबातील बालकांचे जगणे संघर्षशील आहे. तेथील मुलांचे भावविश्व काळजीत पाडणारं आहे खरे! व्यसनी, अज्ञानी, अंधश्रद्ध पालकांच्या मुलांचे भावविश्व आजही धोक्यात असते, पण सर्वसाधारण बालकांना संगोपन सुविधा सार्वत्रिकपणे मिळतात ही समाधानाची गोष्ट होय.
पाश्चात्त्य जागतिकतेचे बाळकडू

 जागतिकीकरणानंतरच्या काळात जन्माला आलेल्या मुलांना उपजतच तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. त्यांना कळू लागले, ती खेळू लागतात तीच मुळी स्वयंचलित खेळण्यांशी. त्यांचे जेवणे, वेळ घालवणे, दूध पिणे हे सारं चालते टी.व्ही.च्या तालावर. ती आपल्या वाढीच्या काळात कल्पनेच्या व संस्कृतीच्या नव्या जगात वाढतात. ती संस्कृती जागतिक असते. त्यांच्या कार्टून कथा एकाच वेळी भारतातला छोटा भीम, बाल गणेश, बाल हनुमान, जपानमधला सिंचान, नोबिता, इंग्लंडमधला हॅरी पॉटर, अमेरिकेतला मिस्टर बीन येतो. तो भारतात राहून सारं जग बघत असतो. त्याच्या हातात नुसता रिमोट नाही येत, तर अख्खं जग नि घर नियंत्रित करण्याची गुरुकिल्लीच त्याच्या हाती येते. लहानपणीच त्याला ऐश्वर्या, कॅटरिना, सलमान, अमीर,

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३६