पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/155

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वर्ग पाहिल्याची अनुभूती. या देशात सर्वाधिक महत्त्व आहे ते निसर्गाला. कारण निसर्ग हीच या देशाची ‘लाइफ लाईन' मानली जाते, जीवनरेखा का तर देशाचा ३१% भूभाग जंगलाने वेढलेला. नुसत्या जंगलामुळे सुमारे १ लक्ष लोकांना रोजगार मिळतो. इथले हवामान थंड. प्रदेश बर्फाच्छादित. पाण्याचे स्रोत जिकडे-तिकडे. सर्वत्र नद्या, तळी, सरोवरे. पाणी सर्वत्र वाहतं. चौकशी करता समजले की इथले जलप्रवाह वाहते ठेवण्याचे बंधन तिथल्या घटनेतच आहे. निसर्ग संरक्षण व संवर्धनाचा घटनात्मक विचार करणारा हा जगातला एकमेवाद्वितीय देश असावा. इथले सरकार शुद्ध पाण्याची जनतेस हमी व शाश्वती देते.
 नळाचे पाणी मिनरल बॉटलच्या पाण्यापेक्षा ५00 पट स्वस्त देण्यात त्या सरकारला कोण आनंद असतो. आपल्या देशातील हिमाच्छादित पर्वतीय प्रदेशाचं तापमान सेल्सियसनी कमी झाले म्हणून त्यांनी राष्ट्रीय आपदा योजना आखली! घरबांधणीला लाकडाच्या वापरावर बंदी आणलेला हा देश- तेही विपुल जंगल असताना! पूर्वी लाकडाचा वापर घरोघरी उष्णतामान कायम ठेवण्यासाठी केला जायचा. घरोघरी शेकोटी असायची. आता त्याची जागा सेंट्रल हिटींग, इलेक्ट्रिक फर्नेस, हिटरनी घेतल्याने जळण म्हणून लाकडाचा होणारा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे त्यांना कोण समाधान. आपण होळीचा सण साजरा करतो. यात आपण निसर्ग साधनांचा अपव्यय करतो असे वाटत नसणं आपल्या पर्यावरण निरक्षरतेचं लक्षण मानावं लागेल. ५0,000 वनस्पतींचे प्रकार ३0,000 जीव प्रकारांनी समृद्ध हा देश निसर्गाचाही स्वर्गच ना?

 इथली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या देशानं कागद, पत्रे, प्लास्टिकच्या पुनर्वापरावर (Recycle) केंद्रित केलेले लक्ष. या क्षेत्रात हा जगातला क्रमांक एक वर असलेला देश असे त्याचे वर्णन केले जाते. तिथली रेल्वे या प्रकल्पात आघाडीवर आहे. आपल्या प्रत्येक स्टेशनवर व रेल्वेच्या डब्यात मिळणारी रद्दी, बियर, कोकचे पत्र्याचे डबे, प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या तेथील रेल्वे कर्मचारी प्रत्येकक्षणी गोळा करत असतात. दरवर्षी नुसत्या प्लॅस्टिक बाटल्या ते २.५ दशलक्ष गोळा करतात. त्यातून त्यांना ६५,000 टन प्लॅस्टिक मिळते. त्याचे ते गाद्या, उशा, टी शर्टस बनवतात. तेथील नागरी वापरातील ४७% वस्तूंचा ते पुनर्वापर करतात. भारतीय रेल्वेने एवढे एक काम केले तर स्टेशन्स, डबे स्वच्छ राहतील व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एवढ्या एका उपक्रमामुळे तिचा तोटा संपेल इतकी घाण भारतीय नागरिक प्रवासात करत असतात.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५४