पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/160

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जलहि सर्वस्वम्!

 थोडा विरंगुळा होता म्हणून रिमोटशी चाळा करत परवा मी पाहात होतो की कोणत्या चॅनलवर कोणता चित्रपट आहे? या चाळ्यात एका चित्रपटाने मला खिळवून ठेवलं. चित्रपट इंग्रजी होता. नाव होतं Lucky Miles. चित्रपट वैराण प्रदेशात पाण्याचा शोध घेणारे तीन गट दाखविण्यात आले होते. पैकी एक गट होता प्रवासात योगायोगाने एकत्र आलेल्या त्रिकूटाचा. त्यांची भाषा, धर्म, देश, संस्कृती सारे भिन्न होते. समान लक्ष्य होते... पाणी! दुसरे होते पोलीस. गस्त घालता घालता वाट चुकतात अन् त्यांना मैलोगणिक आपल्या जीपमधून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. गमतीचा भाग असा की कितीही प्रवास केला तरी संपणार नाहीत इतकी पेट्रोलची बॅरल्स, कॅन्स होते; पण पाण्यासाठी साधे जारही नव्हते. आजच्या काळात माणसाला पेट्रोल इसेन्शियल वाटतं... पाणी नाही! पाण्याचे महत्त्व ते नसल्यावरच कळते! तिसरी दोघांची जोडी होती. पैकी एक लंगडा तर दुसरा धडधाकट. पाणी नसलं तरी लंगडा मोठ्या हिकमतीने वाळवंट, वैराण माळ, वन, डोंगर लीलया पार करायचा; पण त्या धष्टपुष्ट माणसाचे पाण्याअभावी गर्भगळित होणे दाखवत सांगितले होते की पाणी मुळात तुमच्यातच असावे लागते. चित्रपटाच्या शेवटी Lucky Miles यातील एकच माणूस गाठतो जो स्वतः तहानलेला राहात दुस-याला पाणी देत राहतो. पाण्याचे नेमके महत्त्व, माहात्म्य सांगणारा हा चित्रपट कोणतेही भाष्य न करता माणूस समजावतो.

 असेच काही दिवसांपूर्वी पुण्याच्या एका मुलीचे सहारा की गोबी वाळवंट पायी पादाक्रांत करत असतानाचे अनुभव ‘अनुभव' मासिकात वाचल्याचे आठवते. त्यातही पाण्याचे महत्त्व, मृगजळ, वाळवंट, वादळ,

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५९