पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/161

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उंट असे अनुभव आहेतच. पण सगळ्यात माझ्या लक्षात राहिलेली एक गोष्ट... ती मुलगी प्रवास करताना तिचे खांदे दुखत होते, पाय धरायचे, गळा कोरडा पडायचा... हे सर्व होतेच; पण या प्रवासात मैलोन्मैल कोणी कुणाशी बोलायचे नाही. म्हणजे बोलावेसे वाटायचे नाही का? तर निसर्ग अबोल होता; त्याचा परिणाम. ना पाण्याची खळखळ, ना वा-याची सळसळ, ना पक्ष्यांचा चिवचिवाट, ना झाडे, फुले, फळांचे रंग, आकार, गंध, चव... वैविध्य! पाणी नसलं की माणसाचे जीवन कसे मूक, म्लान होऊन जाते. ह्या नसलेल्या त्या प्रदेशातील प्रवासात सोबत असून प्रत्येकाला एकटे वाटायचे... प्रत्येकजण स्वतःशीच इतका बोलायचा, इतका बोलायचा की त्या आत्मसंवादांनी प्रत्येकाला स्वतःची अधिक ओळख करून दिली होती. पाणी नसले की माणूस आत्मसंवादी, अंतर्मुख, काटकसरी, सजग होतो. पाणी... गरजेपेक्षा अधिक असणे... त्याला बहिर्मुख, मस्तवाल, उधळा, बेजबाबदार, आळशी बनवते.
 पाणी असावे का नसावे? तर माझं उत्तर गरज असेल त्यापेक्षा थोडे ते कमीच असावे. घरात आयत्या येणा-या नळाच्या पाण्याची आपण कोण उधळमाधळ करत असतो म्हणून सांगू! कमोड नि फ्लश संडास वापरणे म्हणजे मला चैन वाटते. ओंजळभर लघवीसाठी पाच लीटर पाण्याचा नाश ? ‘जोहड' यशस्वी करणारे व राजस्थानची पाण्याची तहान भागवणारे डॉ. राजेंद्रसिंह यांनी पाण्याचे दुर्भिक्ष असताना राजस्थानी माणूस अंघोळ कसा करतो ते समजावले होते. माणसाला अंघोळीला घंगाळभर, हंडाभर, बादलीभर पाणी लागत नाही. अंघोळ करायला माणसाला तितकेच पाणी पुरेसे होते, जितकं तहान भागवायला आवश्यक असते. तहान भागवायला माणसाला ५२ तोळे पाणी लागते, तितकेच अंघोळीलाही! बावन्न तोळे म्हणजे ग्लासभर पाणी! राजस्थानी माणूस ग्लासभर पाणी घेतो. त्यात पातळ पंचा बुडवतो. ग्लासात पिळतो. ओल्या पंचाने अंग पुसतो. असे ग्लासातले पाणी संपेपर्यंत करतो. झाली त्याची अंघोळ. ती तुमच्या टबबाथइतकीच स्वच्छ असते. त्याला तुम्ही भले कावळ्याची अंघोळ म्हणा की चिमणीची!

 मध्यंतरी वि. स. खांडेकरांचं समग्र असंकलित अप्रकाशित साहित्य प्रकाशनाचे काम करत होतो. त्यात माझ्या हाती एक लघुनिबंध आला. त्याचे शीर्षक होते, ‘अर्धं भांडं पाणी'. वि. स. खांडेकरांच्या ‘अजूनि येतो वास फुलांना' शीर्षक संग्रहात मी त्याचा समावेश केला आहे. त्यात वि. स. खांडेकरांनी महात्मा गांधींची एक छोटी आठवण सांगितली आहे : ‘गांधीजी

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६०