पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/19

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विवाहपूर्व शरीरसंबंध हे केवळ प्रेमिका व प्रेयसींचेच असतात असे नाही. बालहत्या प्रतिबंधकगृहात येणा-या कुमारीमातांच्या मुलाखतीत, त्यांच्या व्यक्तिचिकित्सेत व अनाथाश्रम, बालकाश्रमासारख्या ठिकाणी मूल ते माणूस म्हणून गेली ४० वर्षे मी येनकेन प्रकारेण संबंधित असल्याने असे दिसून आले आहे की असे संबंध भाऊ-बहीण, मामा-भाची, काका-पुतणी, इतकेच काय पण मुलगी व बाप यांच्यातही दिसून आले आहेत. आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर हे संबंध इतके सार्वत्रिक आहेत की त्याला या देशातील मान्यवरांचे परिवारही अपवाद नाहीत. विवाहपूर्व शरीरसंबंध एकाच जातकुळीचे असत नाहीत. भिन्न जाती, भिन्न रक्तगट, गोत्र इ. मुळे निर्माण होणा-या संकरातून ही संतती जन्माला आल्याने ती मान्य व पारंपरिक व एकाच प्रकारच्या रक्तसंबंधातून येणा-या संततीपेक्षा कधी अत्यंत हुषार, बुद्धिमान, सुस्वरूप तर कधी अपंग, मतिमंदही असते.

 अनैसर्गिक परिस्थितीत जन्माला येणा-या संततीच्या विकास व वाढीच्या अनेक टप्प्यात त्यांचे प्रश्न नित्य नव्या आव्हानांना घेऊन उभे राहात असतात. अशा संततींचा प्राथमिक प्रश्न असतो तो संगोपनाचा. ज्या वयात त्याला आईच्या उबेची व स्तनपानाची सर्वाधिक गरज असते नेमक्या त्या क्षणीच ती आईस मुकतात. पुढे त्यांचे संगोपन अर्भकालय, अनाथाश्रम इ. संस्थांत होत असते. अशा ठिकाणी त्यांची काळजी डोळ्यात तेल घालून व अत्यंत काळजीपूर्वक होत असली तरी ती त्या संस्थांच्या सार्वत्रिक समान व्यवस्थेमुळे, सब घोडे बारा टक्के या न्यायाने होत असल्याने, अशा अर्भकांकडे व्यक्तिगत लक्ष फारच अपवादाने दिले जाते. या संदर्भात शासनाने आखलेल्या ‘अर्भकालय' योजनेत मुलास मासिक १२५ रु. देण्याची फक्त व्यवस्था आहे. अर्भकांच्या जाणीवपूर्वक वाढीसाठी काळजीवाहक माता, परिचारिका, डॉक्टर, समाजसेविका, पर्यवेक्षिका, संगोपनाची साधने, सुविधा, उपचारव्यवस्था लागते हे सरकारच्या कानीकपाळी ओरडूनही लक्षात येत नाही, यासारखी या अश्राप अर्भकांच्या संगोपनाची दुसरी शोकांतिका ती कोणती असणार? विवाहपूर्व संबंधातून जन्मलेली व विलक्षण दबावात गर्भावस्थेत वाढलेली मुले शारीरिक व मानसीक व्याधींनी ग्रासलेली असतात. अशा अर्भकांना सामान्य, प्रसन्नमुख व बोलके करणे हे आव्हान असते. यात यश आले की मग शिक्षणाचे त्यांचे प्रश्न आणखीन गंभीर होतात. मुले वाढू लागली की त्यांना आपण समाजातील घरा-घरात वाढणाच्या इतर मुला-मुलींपेक्षा भिन्न आहोत याची जाणीव होऊ लागते. त्यातून नवे मानसिक संघर्ष निर्माण होतात. अशा संघर्षातून वाट काढत शिकणे एक दिव्य असते. शिवाय

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८