पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/21

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याची अनेक कारणे आहेत. विवाहोत्तर काळातील विवाहबाह्य शरीरसंबंध साधारणपणे ३० ते ४० वर्षे वयाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. स्त्री-पुरुष आपल्या वैवाहिक जीवनात प्राथमिक उभारीचे शरीरसुख घेऊन सुखावलेले असतात. अशा सुखावलेल्या दांपत्यात कधी स्त्रीस तर कधी पुरुषास सुरुवातीला तोच तोपणा फारसा प्रेरक व आकर्षक वाटत नसतो. चवीत बदल जितका सहज अपेक्षित असतो तितक्याच सहजतेने स्त्री-पुरुष दुस-या स्त्री-पुरुषांकडे नव्या ओढीने आकर्षिले जातात. हा माणसाच्या शरीर विकासातील दुसरा वसंतऋतूच असतो. ज्या दांपत्यात शरीरसुखाचा अपेक्षित आनंद मिळत नाही अशा दांपत्यात शरीराची सहज भूक शमविण्यासाठी परस्त्री अथवा पुरुषाविषयी ओढ निर्माण होऊन असे संबंध निर्माण होत असतात. हे शरीरसंबंध विवाहपूर्व संबंधांप्रमाणे चोरून, लपूनच येतात. या संबंधातही सामाजिक मान्यता, प्रतिष्ठा, भय इ. चे दबाव असतात. पण शरीरसुखाचा पूर्वानुभव, प्रौढपण, मासिक धर्माच्या दृष्टीनी उपयुक्त कालखंड, उपायाची माहिती इ.चा विचार करण्याची कुवत व प्रौढता आल्याने अशा संबंधातून संतती निर्माण न होण्याची दक्षता घेतली जाते. शिवाय अशा दक्षतेनंतरही गर्भधारणा झाल्यास विवाहपूर्व संबंधाइतकी ती धोकादायक नसल्याने तांदळात तांदूळ मिसळून जाणे सहज शक्य असते. इतक्या साच्या लटपटीतून असे संबंध उघडकीस आल्यास त्याची परिणती कुटुंब दुभंगण्यामध्ये होत असते. अशा संबंधांच्या संशयाचा वास हा जन्माला येणाच्या संततीच्या नाशास कारणीभूत होत असतो.
 विवाहबाह्य संबंधातून गर्भधारणा झाल्यास आपल्या समाजात स्त्री घटस्फोटित झाली तरी रखेली म्हणून राहू शकत असल्याने अशा संबंधातून निर्माण होणा-या संततीच्या संगोपन व सुरक्षेची जबाबदारी संबंधित पुरुषावर येते व तो बहुधा ती स्वीकारत असतो. अपवादानेच अशा संतती संस्थात्मक संगोपनव्यवस्थेकडे येतात.

 विवाहपूर्व व विवाहोत्तर बाह्य संबंधांच्या वरील विवेचनात एक गोष्ट स्पष्ट होते की पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्था व पुरुषी संस्कृती यामुळे या संबंधांचा जितका आघात स्त्री व संततीवर होतो तितका तो पुरुषावर होत नाही. विवाहपूर्व व विवाहोत्तर अनैतिक संबंध हे पुरुषाच्या बाबतीत पुरुषार्थाची बाब ठरते. उलटपक्षी स्त्रीस मात्र कुलटा, बदफैली, भ्रष्ट, अप्रतिष्ठित मानले जाते. हे चित्रही बदलण्याची गरज आहे.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/२०