पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/22

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विवाहबाह्य संबंध हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक खरे, पण अपघाताने वा धर्म म्हणून आलेल्या अशा संबंधांकडे आपण अकारण बाऊ करून पाहतो आहोत. शरीरसंबंध, विवाहव्यवस्था, कुटुंबसंस्था, विवाहरीती, विवाहबंधने इ.च्या संदर्भात बदलती सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आज त्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीत मुक्त शरीरसंबंधाने निर्माण होणा-या अनौरस पिढ्या धोक्याची घंटा वाजवीत आहेत हे खरे. पण कृत्रिम बंधनांचा वाढता माराच माणसास व्यभिचारी बनण्यास भाग पाडत असतो हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे विवाहपूर्व व विवाहोत्तर अनैतिक संबंध व त्यातून निर्माण होणारी संतती याकडे सामाजिक स्वास्थ्य व स्थैर्याच्या भूमिकेतून उदारपणे पाहायला हवे. अन्यथा घरोघरी कर्ण, शकुंतला जन्मतील, स्तोम माजवणाच्या घरोघरी कुंती, विश्वामित्र निर्माण होतील. झाकलं कोंबडं बावनकशी' ही रूढ कल्पना वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर प्रत्येक वेळी पारखायची नसते. समाजातील सर्वच संबंधांचा व त्याच्या परिणामांचा विचार विवेक व तारतम्याने करणे यातच सामाजिक सुख व शांतता सामावलेली असते.





एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/२१