पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/34

हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे म्हणणे बरोबर होणार नाही. येथील मातीत तत्कालीन संस्थानिकांनी रुजवलेल्या उदारमतवादी वृत्तीमुळे येथील दातृत्वभावही सतत समृद्ध होताना दिसून येतो. अशा कामांना वरच्या, चढत्या भाजणीने मिळणारे अर्थसाहाय्य हेच सांगते.
 दक्षिण महाराष्ट्रातील विद्यमान सामाजिक कामांमागे एकेका समर्पित व्यक्तीचे सततचे कार्य आहे. या व्यक्तींचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल की ते पुण्या-मुंबईसारख्या शहरात दिसून येणारे, लठ्ठ मानधन घेणारे व्यावसायिक समाज कार्यकर्ते नाहीत. घरचं (किंवा पदरचं!) खाऊन लष्कराच्या भाकच्या भाजणारी ही मंडळी! या मंडळींनी आपलं पोट चालविण्यासाठी छोट्यामोठ्या नोक-या पत्करल्या. उर्वरित सारा वेळ त्यांनी या कामाला दिला. हे काम त्यांनी इमानेइतबारे केले. आपल्या संस्था लाभकेंद्रित न करता लाभार्थी केंद्रित केल्या. नित्य नवे उपक्रम राबवून मदर टेरेसांचे तत्त्व अनुसरले. संस्था चालवताना त्यांनी स्वत्व नि स्वाभिमान जपला. आपल्या कामात स्वदेशाबरोबर विदेशी संस्थांची, आंतरराष्ट्रीय संस्थांची गुंतवणूक वाढवली. आपल्या कामासंबंधी पारंपरिक दया, करुणेच्या जागी धीर व सहकार्याच्या भावनांची रुजवण केली. काहींनी आपल्याच संस्थांत नोक-या पत्करल्या पण कामाची मूल्यवत्ता वाढावी व तळमळ टिकावी म्हणून. बहुधा सारी कार्यकर्ती मंडळी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली, उच्चविद्याविभूषित. सर्वांत कमी अधिक प्रमाणात व्यक्तिगत आयुष्यातील शल्य वा भोगाच्या उन्नयनाचा दिसून येणारा भाव! त्यातून कामात विलक्षण गती व समर्पण प्रतिबिंबित होतं. या साच्या सामाजिक संस्थांचा सेवा दर्जा उंचावलेला. लाभार्थीना देखील आत्मभान देण्याचे फार मोठे कार्य या संस्था व कार्यकत्र्यांनी केलं. हे काम त्यांनी व्यक्तीकेंद्रित ठेवलं नाही. आज दुसरी फळी उभारायची नितांत गरज सर्वच कामात प्रकर्षाने जाणवते. या सा-या संस्थांचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्या राजकारण व राजकारणीमुक्त राहिल्या. सर्व राजकीय पक्षांची या कामाबद्दलची भूमिका उदार व सहकार्याची राहिली. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, महात्मा गांधी आदि समाजसुधारकांचा वारसा येथील कामांनी विधायक मार्गाने विकसित केला.

 कोल्हापूरच्या बालकल्याण संकुल, हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, स्वयंसिद्धा, चेतना मतीमंद विकास मंदिर, मातोश्री वृद्धाश्रम, रेडक्रॉस सोसायटी, जिज्ञासा, लोहिया मूकबधिर विद्यालय, दिलासा, देवदासी पुनर्वसन संस्था, मुस्लीम तलाकपीडित पुनर्वसन केंद्र यांसारख्या संस्थांतील डॉ. सुनीलकुमार लवटे,

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/३३