पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/78

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आतल्या खोलीत रेडिओ गुणगुणू लागला. पुढे मग ट्रान्झिस्टरचं काही दिवस अधिराज्य आलं. टेपरेकॉर्डरने त्याला मागे टाकलं. मग दिवाणखाना दूरदर्शन संचाने दिमाखदार झाला. चाळीत, गल्लीत, अपार्टमेंटमध्ये असलेल्या एकुलत्या संचाभोवती शेजारचा सारा गराडा पडायचा. पुढे कृष्णधवल दूरदर्शन संचाची जागा रंगीत टी.व्ही. ने घेतली. उठबस नको म्हणून दूरनियंत्रक (रिमोट कंट्रोल) हाती आला, तो चॅनल्सच्या पावसामुळे. एक-दोन करत शंभर चॅनल्स नाचू लागली. रेडिओच्या ‘बिनाका गीतमाला', 'आपली आवड', श्रुतिकांची जागा सिरियल्स, अॅडस्, क्रीडावाहिन्या, वृत्तवाहिन्यांनी घेतली. तिकडे टेलिफोन जाऊन मोबाइल आला. एस्.एम्.एस्, गेम्स, रिंगटोन्स, मिस कॉलनी ‘कर लो दुनिया मुट्ठी में'ची मगरमिठी आवळत गेली. बेडरूम स्टडीरूम झाली ती संगणकामुळे. पुढे इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेला मनुष्य खोलीतच जेरबंद झाला. भरीसभर म्हणून फ्रीज, मिक्सर, व्ही.सी.डी. एम्.पी.श्री, होम थिएटर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशिंग मशिन इ. मुळे घरात माणसं कमी नि यंत्र जास्त, संवाद कमी नि तंत्रवाद जास्त अशी स्थिती झाली. या साच्या राड्या-रगड्यात कुटुंबपण कधी हरवलं ते कळलंसुद्धा नाही. आताशा घरातील लोक म्हणे ‘कमर्शियल ब्रेक' मध्येच एकमेकांशी बोलतात, विचारपूस करतात. पूर्वी रिमोट बाबांच्या हाती होता तो आता आईच्या हाती कसा आला ते समजून घ्यायचं तर 'घर-घर की कहानी' पहावीच लागेल. ‘सास भी कभी बहू थी' आता केवळ एक धारावाहिक राहिली नाही. ती घराघरात वाहणारी गंगा झालीय. एमटीव्ही,सारख्या चॅनल्सनी आमचे कपडे बदलले. टी.व्ही.वरच्या जाहिरातींनी घराचे रंग बदलले. 'हम भी बिर्ला व्हाइट वाले हो गये' म्हणत लग्नाचं रूपांतर स्वयंवरात करण्यास साक्षात् आजीच राजी झाल्याने प्रेमविवाहास राजमान्यता मिळून गेली. घरातील साजूक तुपाची जागा आता गोकुळ, वारणा, चितळे घेते झाले. वाटण-घाटण चुटकीसरशी होऊ लागलं. बघताबघता घर रेडिमेड झालं. ‘पैसा फेको तमाशा देखो' हे जीवनाचे तत्त्वज्ञान होऊन गेलं. चॅनल्स नि इंटरनेटने कुटुंबाची संकल्पनाच मोडीत काढली. ते आता एक ‘यंत्र-घर' झालं. यंत्रघर झाल्याक्षणी कुटुंबाचा जिव्हाळ्याचा झरा आटला! आपुलकीचा मंत्र लोपला!

 माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीने कुटुंब साधन संपन्न झालं. घराची भौतिक समृद्धी वाढली. मुलांचा बौद्धिक विकास झाला. इंटरनेटच्या वेबसाइटस, मल्टीमिडियातील गेम्स, डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिकसारख्या चॅनल्सनी कुटुंबाची निसर्गजाण वाढवली. हिस्टरी चॅनलने दुसरं महायुद्ध, व्हिएतनामचा लढा सजीव केला. त्यामुळे वैश्विक जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. हे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७७