या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विलास आहे असे मानून आपण चिकित्सक आवृत्तीच्या मागे दडलेल्या इतिहासाचे मार्ग शोधू शकतो. पण असे न करता आहे हे महाभारत डोळ्यांसमोर ठेवून अर्थ लावताना आपण हेही म्हणू शकतो की कर्णाला डोळ्यांसमोर पराभव दिसत होता. आपली बाजू नष्ट होणार, दुर्योधनासकट आपण मरणार हे भवितव्य त्याला दिसत होते. आणि हेच घडणे रास्त आहे कारण धर्मात्मा युधिष्ठिराची बाजू बरोबर आहे. विजय त्याचाच झाला पाहिजे असे कर्णाचे मत होते. एकदा या मार्गाने आपण जाऊ लागलो की कर्णाच्या वधामागे आत्मबलिदान दिसू लागते. रवींद्रनाथांनी या बलिदानाच्या भूमिकेचा सौम्य असा उपन्यास केलेला आहेच. दुर्गा भागवतसुद्धा असे मानतातच की कर्णाच्या मनात अर्जुनाच्या रक्षणाची इच्छा तीव्र होती. अर्जुन वाचावा ही अर्जुनाविषयी दयाबुद्धी कर्णाच्या ठिकाणी आहे. देशमुख या बलिदानाला उदात्त, नैतिक आधार देऊ इच्छितात तो धर्मरक्षणाचा आहे. हा धर्मरक्षणाचा मुद्दा वाटतो तितका सरळ व सोपा नाही. तो कर्णाचे उदात्तीकरण करीलच असे नाही. तो कर्णाला हिणकससुद्धा करून टाकील हे महाभारताच्या अभ्यासकाला विसरता येणार नाही.

 महाभारताची रचनाच चमत्कारिक आहे. भाषाशैलीच्या दृष्टीने आपण महाभारत पाहू लागलो तर सर्व विशेषणांचा रोख प्रामुख्याने कौरव आणि त्यांची वाजू यांच्याविरुद्ध झुकलेला आढळून येतो. ही पांडवाची जयकथा असल्याने विरोधकांची त्यात वदनामी आहे असे मानता येत नाही. कारण भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा हे कौरवांच्या बाजूचे होते. गांधारी आणि विदर हेही कौरवांची वाजू सोडू शकत नव्हते. या सर्वांच्याविषयी महाभारत आदरपूर्वक बोलत असते. विशेषतः अश्वत्थामा शेवटपर्यंत दुर्योधनाशी प्रामाणिक राहिलेला आहे. संपूर्ण पराभव झाल्यानंतर सर्व प्रकारचे पाप आपल्या डोक्यावर घेऊन अश्वत्थाम्याने बेसावध पांडवांच्या सर्व सेना अतिशय क्रूरपणे कापून काढल्या. नुसत्या कापूनच काढल्या नाहीत तर ही सुखद वार्ता दुर्योधनाला कळवन त्याला समाधानाने मृत्यू यावा ही सोय केली आणि धतराष्ट्र व पांडवांची भेट होण्यापूर्वी हा समाधानाचा मुद्दा त्याच्या कानावर घालून मगच निरोप घेतला. अगदी शेवटच्या क्षणी अश्वत्थाम्याने गर्भातच परीक्षिती मरण्याची सोय करून पांडवांचा निर्वंश करून टाकला होता. आपले प्रामाणिक विरोधी मत दिल्यानंतर दुर्योधनाशी एकनिष्ठ राहण्यात अश्वत्थामा कोणत्याही प्रकारे कमी पडला नाही. पण महाभारतात अश्वत्थाम्याचा उल्लेख सामान्यपणे आदराने केलेला असतो. हे मुद्दाम एवढयाचसाठी सांगावयाचे की कर्ण केवळ कौरवांच्या बाजूने उभा राहिला म्हणून महाभारताची भाषाशैली त्याच्याविरुद्ध गेलेली नाही.
४२

ओळख