या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हशी

म्हशी किती निवांत असतात
त्यांना कधीच होत नसावा ब्लडप्रेशर किंवा शुगरचा त्रास.

एखाद्या स्थितप्रज्ञ कातळासारख्या काळ चघळत...
म्हशी कधी रवंथ करत असतात...
कधी टळटळीत उन्हात सूर्याला वाकुल्या दाखवत...
तळ्यात नाकाडं वर करून डुंबत असतात...
कधी बावरलेल्या बटबटीत डोळ्यांनी गोठ्यात
चिंता ग्रास' खात मुकाट बसलेल्या असतात...
तर कधी पायातलं लोढणं चुकवत फेंगाडत उधळताना
मोकाट असल्याचा आव आणत असतात...

म्हशी किती स्वस्थ असतात पिढ्यान्पिढ्यांच्या सवयीनं
कासेचं रेडकू बाजूला सारून चरवीत दूध पिळून घेणाऱ्या
धन्याबद्दल करूण श्रध्दा डोळ्यात साठवून

'भरवशाच्या म्हशीला टोणगा' झाल्यावरही
कधीच होत नाही तिचा अपेक्षाभंग
द्यायचं तसंच दूध देत, ती पुन्हा पुढच्या वर्षीचा
वायदा करते मूकपणे... आणि टोणग्यालाही चाटते प्रेमभरानं...

म्हशी किती निरागस असतात
दुभत्या झाल्यावरही त्यांना कळतच नाहीत व्यवहार
मालक बदलला तरी बदलत नाही
त्यांची धार द्यायची सवय
त्या का जन्मतात, कशा मरतात,
त्यांचं दूध कोण पितं... कशाचीच नसते त्यांना खबरबात.
त्यांच्याच कातडीचे जोडे घालून मालक दूध केंद्रांवर

आणि नोटा त्यांच्या खिशात

४/ कबुतरखाना