या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्ध्या रात्री दुधाचे टँकर महानगरात...
माणसं पैसे कशी खातात याचा विचार करत म्हशी
मनातल्या मनात फिदीफिदी हसतात म्हणे गोठ्यात बसून.

संभोगाकडून समाधीकडे जाण्याचेही म्हशींचे मार्ग
आता बंद आहेत कारण...
म्हशींच्या खुरांवर मोजता येतील एवढेही रेडे
मालक शिल्लक ठेवत नाहीत.
आणि मालकांना मात्र फक्त मुलगेच व्हायला पाहिजेत,
यामागचं गौडबंगाल म्हशींना अजूनही कळलेलं नाही.
कितीही चारा घोटाळे झाले तरी
म्हशी म्हणजे चाऱ्याचं दुधात रूपांतर करणारं
फक्त एक जिवंत मशीन!

म्हशी किती मठ्ठ
भाकड झाल्यावर निमूट जातात कसाईखान्यात...
म्हशींना गाईंसारखं देवत्व मिळालं नाही कधी
त्यांची तशी तक्रार अथवा मागणीही नाही सरकार दरबारी
गाईंचा द्वेष करण्याइतका अतिरेकी मत्सरही नाही त्यांच्यात

जन्मापासून मरेपर्यंत अज्ञानाची काळीकभिन्न पखाल
त्यांच्या पाठीवर ओझे होऊन...
परंपरेच्या ट्रॅफिकचे सगळे सिग्नल
म्हशी अज्ञानातून आलेल्या प्रचंड आत्मविश्वासाने तोडतात...
या गुन्ह्याबद्दलसुध्दा त्या अनभिज्ञच असतात...
दुष्काळात उपासमारीनं प्रमाणाबाहेर हडकलेल्या त्यांच्या
बरगड्या दाखवणारे फोटो

प्रमाणाबाहेर डाएट केलेल्या मॉडेलसारखे वर्तमानपत्रात छापून येतात...

कबुतरखाना /५