या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्कार

दोस्त होऽऽऽऽ
काल त्यांनी माझा सत्कार केला
आणि माझा एक फोटोसुध्दा काढला...
काळ्या गाऊनमधला
मग त्यांनी मला एक सुरळी केलेलं प्रशस्तिपत्र
पदवी म्हणून प्र-दान केलं...
बापजाद्यांच्या इस्टेटीवर
कमवून आणायची दोनपाच वर्षं आरामात बसून काढली म्हणून.

...मग हे म्हणाले, 'आता आम्ही तुझी मिरवणूक काढणार'
मी घाबरलो, गांगरलो, मागं मागं सरकायला लागलो
तर यांच्यातल्याच एका खळीच्या टोपीवाल्यानं
एक शक्कल लढवली...
त्यानं एक पेंडी बांधली मोठमोठ्या आश्वासनांची
आणि माझ्यापुढं चालू लागला.
मग मीदेखील नुकत्याच घेतलेल्या ईदच्या बकऱ्यासारखा
त्यांच्या मागून आशेनं चालू लागलो निमूट
आणि आमच्यामागं हे सगळे ढोल-ताशे वाजवत
घोषणांचा गदारोळ उठवत...
त्या सगळ्या कोलाहलात ते काय कोकलतायत
ते काहीच कळत नव्हतं.

मिरवत मिरवत त्यांनी मला एका समुद्राच्या काठाशी आणलं.
असा समुद्र ज्याची नामोनिशाणी या देशाच्याच काय पण
संपूर्ण जगाच्या नकाशात कुठंच आढळणार नाही.
त्या समुद्रात माझ्यासारखीच अनंत डोस्की

अथांगपणे तरंगत होती.

८/ कबुतरखाना