या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्ही केला... तो फक्त षंढांचा व्यवहार
आम्ही घडवला नाही नवा समाज, पण समाजाच्या टाळूवर
एक गळू निर्माण केलंय मोठ्...
जे कापताही यायचं नाही कधी'

तेवढ्यात, एक हात वर आला आणि
त्यानं माझं मुंडकं समुद्रात दाबलं.
गटांगळ्या खात खात तळाला गेलो तेव्हा
एक जण गुदमरत म्हणाला...
'त्याचा हात वरपर्यंत होता. त्याला सरकारी नोकरी मिळाली.'
माझी पोटतिडीक आणखीच हताश झालेली
घुसमट थांबवावी म्हणून
या सगळ्या चेंबाचेंबीत मी कसेतरीच हातपाय मारत राहिलो
आणि जिवाचा आटापिटा करून एकदाचं
मुंडकं समुद्रसपाटीवर काढलं
खुल्या श्वासाचा हर्ष उरात साठवत एक आनंदाचा चित्कार
ओठातून फुटू पाहत होता... इतक्यात
धप्पदिशी काहीतरी माझ्या उरावर येऊन आदळलं
...आणि माझ्या लक्षात आलं,
बहुतेक आजही कुणाचा तरी
सत्कार झाला असावा.

१०/ कबुतरखाना