या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती आलीय

ती आलीय
एक लपलपती, अखंड, अविरत शून्यगतीनं धावणारी
किळसवाणी झुंड
तिला रोखू शकले नाहीत
कसलेच धर्म-अधर्माचे दरवाजे
शतकानुशतके, सहस्रकानुसहस्रके
ती अशीच चिरशांती देत-घेत बेफाट पसरतेय
शून्यगतीनं

ज्ञानाची कवाडं तिनं कधीच पोखरून टाकलीयत
बुलंद चौकटींसकट
पुस्तकातली अक्षरन् अक्षरं चघळून तिनं त्यांची चिकट लाळ
दलदलीसारखी पसरून टाकलीय
त्यावरून मी, तो, ती, ते सारेच जण सटासट आपटतीय बुडांवर
सडकून निघेपर्यंत
... आता तर सारेच इतके असहाय की
पाय असणे, हा कुण्या जन्मीचा गुन्हाच वाटावा...
नंतर आम्ही सारेच
त्या अक्षरांच्या चिकट्याचे अर्थ लावत
एकमेकांना चाचपडत सरपटणे पसंत करतो आनंदाने

शेवटी जगायला मिळणं कसंही,
हाही एक किताबच असतो ना!

ती आलीय, हे आम्हाला फार उशिरा कळतंय
असं आता वाटतंय.
कदाचित आमच्या हजार पिढ्या झाल्या,

तेव्हा त्यांच्या काही अब्ज पिढ्या झाल्या असतील.

कबुतरखाना / १३