या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सध्या कसं आहे ?

"सध्या कसं आहे?” कुणीतरी विचारतं सहज
थोडंसं हसावं वाटतं, ओठ एका कोपऱ्यात गोळा करून
हे ओठ असे कधीही गोळा होतात एका कोपऱ्यात...
विपन्नावस्थेत, हताशपणात, आनंदात, मजेत,
पोरकेपणाच्या जाणिवेने,
कधी कुणी फालतू ठरवलं तरी,
एखादा मेल्याची वार्ता कळल्यावरही
ओठांनी असं एका कोपऱ्यात गोळा होणं
ही एक सोयच म्हणायची

"बरं आहे ना ?"
s ssssss SS SS S SS S?
डोळे उगाचंच मन कुठं असतं तिकडे आत आत वळतात.
भर्दुपारच्या वैशाखात आंब्याच्या सावलीतून एखादा कावळा
गारवा सोडून पेटल्या माळावर भेलकत गेल्यासारखे
डोळे मन असतं तिकडे क्षणात
जीव खाऊन पंखपीट करतात...

कॅनव्हास कोरा अगदी क्षितिजापर्यंत...
कसल्याच रंगाचा कुठंच ठिपकासुध्दा नाही,
कसला डागही पडलेला नाही.
कावळा पुन्हा सावलीला येण्यापूर्वीच
उन्हात कुठंतरी शिजून मरून जातो
डोळे आतच हरवलेले... मन वगैरे असतं तिकडंच कुठंतरी
नजर हरवलेल्या डोळ्यांवर
खाऱ्या पाण्याची एक संथ लाट मुरत जाते
समोर फक्त कोरा कॅनव्हास

वाऱ्यावर अस्वस्थपणे हलणारा

कबुतरखाना / १९