या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जन्म

रात्री...
भक्क पिवळ्या भडाग्नीच्या
स्मशान उजेडातल्या
उजाड चेहऱ्यांच्या माणसांच्या
कोंडाळ्यात कोंडलेल्या

तिथं अतृप्त आत्म्यांचा दबाव
आणि तृप्तीसाठी हपापलेल्या
हलत्या बोलत्या माणसांचा प्रेतवत वावर

रातकिड्यांनाही झपाटलेलं भुतांनी
आणि आग झालेली चेष्टेखोर
तडकडताई

रात्री... सुन्न आठवणींच्या ठिणग्या
सुपात पाडाव्यात तशा...
माणसांना भद्र- अभद्राच्या
गोष्टींनी घोळून घेणाऱ्या
किरवंती ताठर जोड्यांच्या
करकरीने धास्तावणाऱ्या

रात्री... अगम्य
नदीच्या पात्रात बुडी मारून
भडाग्नी देण्यापूर्वी हुडहुडणाऱ्या
वारसांसारख्या

आणि रात्री...
कवितेचा जन्म होताना

ओल्या मातीच्या वासाने

कबुतरखाना / २१