या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चबुतऱ्यांचे एकत्रीकरण...

एकाच घरात
किती वेगवेगळ्या विचारांची,
वेगवेगळ्या मतांची,
वेगवेगळ्या स्वप्नांची,
वेगवेगळ्या छंदांची,
वेगवेगळ्या सवयींची,
माणसं राहत असतात.
त्या 'सह'वासाला काय म्हणायचं ?

उंबऱ्याबाहेर आलेला प्रत्येकजण
कोणतं ध्येय घेऊन पाऊलं टाकत असतो,
कोणत्या वासना भिरमिटत असतात त्यांच्या मेंदूत,
कोणती अदृश्य वेसण त्यांचा रस्ता ठरवत असते,
कोणती झापडं त्यांना नजरबंद करत असतात
आणि तरीही खोल आत त्यांनी
कशा ताणून धरलेल्या असतात
त्यांच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा-ऊर्मी वगैरे वगैरे ?

गल्लीच्या तोंडापर्यंत रुळल्यासारखी वागणारी माणसं हमरस्त्यावर येतात
तेव्हा ती अनोळखी होत जातात का ?
एकीकडे स्वतःबद्दलही अनभिज्ञ
आणि दुसरीकडे स्वतःच्या त्या त्या क्षणांच्या
स्वार्थाबद्दल दुराग्रही, हट्टी, हमरीतुमरीवर येणारी
जणू प्रत्येकजणच झालेला असतो स्वतंत्र मोर्चा
प्रत्येकाच्या कपाळावर त्यांच्या मागण्यांचे
भले दांडगे अदृश्य फलक.

सारीच अडून बसलेली आपआपल्या मुद्दयांवर

२४ / कबुतरखाना