या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सायबांनो!

पाय असून पांगळे
हात असून थोटे
असं काय म्हणता राव...
आम्ही तुमचेच बूटचाटे
 तुम्ही कधीही पसरावी झोळी
 निमूट आम्ही टाकतो दान
 कधी आम्ही पसरता हात
 तुम्ही म्हणता काढा घाण
आभाळाचा मुका घेती
तुमचे जिवंत पुतळे
आ वासून आम्ही बघतो
झाकत ढुंगणावरची ठिगळे
 चुकून कधी आम्ही म्हणावं,
 'काय राव! किती खाता ?'
 तुम्ही कुंथून कुंथून हाणता
 आमच्या कंबरड्यात लाथा
आम्ही सगळे मिळून आता
कंबरच कसावी म्हणतोय
कंबरडं कसं वाचवावं
यावर रोज रोज भांडतोय.

कबुतरखाना / २७