या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निष्ठावान

न पेलवणारं भलं मोठं, निष्ठेचं कुबड पाठीवर वागवत
मी 'स्वातंत्र्याचे' नारे देत नरडं खरवडत चाललोय
तसं या बाकीच्या साऱ्याच कुबड्यांनी
मला हसायचं कारण?

"हसा बेट्यांनी
त्यामुळे कदाचित स्वत:च्या
पाठीवरचं निष्ठांचं ओझं विसरल्याचा
क्षणिक आनंद उपभोगा, हसा! "

तेवढ्यात समोरून आमचा नेता आला.
माझ्या, बेंबीच्या देठापासूनच्या घोषणांनी
त्याचा अहंभाव कुरवाळला, तो हसला, मंद ठेवणीतलं

भोवतीचे कुबडे लीनतेनं आणखीच वाकले.
त्यानं ताठ उभं राहून, हात वर केला 'दिलाशाचा'
कुबडे हुंकारले संतोषजनक... आणखी वाकले
हुंकारासरशी तो मात्र आणखी ताठ

आम्ही ताठ माणसालाच आमचा नेता करतो
... तो त्याचं कुबड आमच्यावर लादण्यात
यशस्वी झाला म्हणून

त्यानं एक भाषण ठोकलं आमच्यावर,
परंपरेचे बेछूट पोवाडे गाणारं.
भाषण ऐकता ऐकता माझ्या कुबडावर
एक गळू फुटतंय असं वाटत होतं

मी लगबगीनं माझ्या पुढच्याच्या पाठीकडं बघितलं

२८ / कबुतरखाना