या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यमदूत

तुम्ही आम्ही मेलो की 'गचकला!” म्हणतात
जरा बऱ्यापैकी असलात तर 'निवर्तले!' म्हणतात
बऱ्यापैकीचा साहेब गेला तर त्याचं 'निधन' होतं
त्याच्यावरच्या सायबाला 'देवाज्ञा' होते
जिल्हा पातळीवरच्या नेत्याचं 'निर्वाण' होतं...
आणि 'महान' नेत्याचं मात्र नेहमीच 'महानिर्वाण' होतं ...
तर अशाच एक महान नेत्याच्या महानिर्वाणानंतरच्या
स्मशानभूमीतल्या शोकसभेत मला यमदूत भेटला...
... एखाद्या निमसरकारी- अर्धवेळ कारकुनासारखाच कळकटलेला

नाटकी आवाजात, कमावलेल्या अभिनयानं हुकमी गहिवरत
भाषणबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांवर
यमदूताचे खट्याळ डोळे
फिदीफिदी हसत होते
म्हणाला, 'ह्या बेट्यांसाठी आमच्याकडं आता
नरकातसुध्दा सेपरेट सेक्शन खोलावा लागेल.'

झाडांवर कावळ्यांची गर्दी दाटलेली
एक कावळा हळूच यमदूताच्या खांद्यावर येऊन बसला
म्हणाला 'हॅलो !'...
बरंच वेगवेगळ्या तऱ्हांनी कावकावला आणि उडून गेला
नंतर यमदूत मला म्हणाला,
'हा उडाला तो आज गचकला त्याचा बाप
म्हणत होता... लेकराची चुकी झालीय फार
तरीही त्याला दाखवा थोडं तरी स्वर्गाचं दार '
'काहीतरी व्यवस्था करा,'

'पाच-दहा लाखांची चिरीमिरी देतो. '

३० / कबुतरखाना