या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोन्ही डोळ्यांवर दोन हात
एक हात तोंडावर आणि दुसरा ढुंगणावर

पण, अशी कोणतीच आज्ञा न पाळणारी माकडं
आज सत्तेवर आहेत.
साम, दाम, दंड, भेदी असा अधिकार
त्यांचाच चालतो, गांधीजी ...
काहीच न झाकणाऱ्या त्यांच्या हातांची किमया
हजार, लाख, कोटीत खेळतेय...

बापू, त्यांनी आमची पूर्णपणे मारलीय...
तरीही आम्ही सर्वसामान्य सारे
तुम्ही सांगितल्याप्रमाणं 'एका गालात थप्पड़ बसली तर
दुसरा गाल पुढं करा' या शिकवणुकीप्रमाणं
त्यांनी एकदा ‘मारल्या'वर दुसरं काय पुढं करायचं
याचा विचार करतोय...
नव्या गांधीवाद्यांप्रमाणं एकमेकांशी भांडतोय...
मधूनच तुमचा पुळका येणाऱ्या आमच्या 'अण्णाबिण्णांना'
विचारत रोज रोज गुदमरतोय आणि आहे तिथंच 'स्टील' होतोय.

त्या अचल स्थिरावस्थेत आम्हाला सहा हात फुटल्यासारखं होतंय
आणि अदृश्यपणे आम्ही आमचे नाक, कान, तोंड
झाकून घेतोय...

३४ / कबुतरखाना