या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डायव्हर्शन

रस्त्यात बऱ्याच ठिकाणी
काळ्या पिवळ्या पट्ट्यांचे डायव्हर्शनचे बोर्ड

अश्मयुगातल्या महाकाय खेकड्यांसारखे
प्रचंड अर्थमुव्हर्स कुठं खोदाखोदी करतायत
कुठं माती उचलून भर घालतायत.

कितीतरी वर्षं मनातल्या पोरपणाला
भुरळ घालणाऱ्या टेकड्या
कांदा चिरल्यासारख्या कापून ठेवलेल्या
प्रवासात कमान करून रस्त्याच्या दुतर्फा
स्वागताला उभी असलेली हिरवीगार जुनी झाड
अमानुषपणे हत्याकांड झालेल्या प्रेतांसारखी
रस्त्याकडेला दुतर्फा रानात पाडून ठेवलेली

मेलेल्या शिकारीवर रानकुत्र्यांनी ताव मारावा तशी,
माणसं झाडांची प्रेतं तोडून ट्रकात भरतायत

एक गर्द हिरवा वर्तमान होतोय इतिहासजमा
उद्याच्या वाळवंटांच्या स्वागतासाठी...
शीर तुटलेल्या मृत गावांच्या लोकगीतांसाठी

काळसर्पाची अजस्र कात पसरावी
तसा डांबरी हायवे उद्या या झाडांच्या थडग्यांवर पसरेल
आणि नवनवीन मॉडेलच्या अगणित गाड्या वारंमुंग्यांसारख्या
हायवेवरून धावतील
प्रगतीच्या नव्या कमानी उभारण्यासाठी

आमचं उज्ज्वल भवितव्य टोल भरून घडविण्यासाठी

कबुतरखाना / ३५