या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तू आता कोण झाला असशील ?

तू आता मोर झाला असशील,
की गोगलगाय,
की सुरवंट .... ?

की एखाद्या वाघिणीचा बछडा,
की एखाद्या हरिणीचं पाडस,
की एखाद्या माशाचं, नाहीतर मगरीचं पिल्लू ?

तू कोण झाला असशील...?

तू गेल्यावर
अंधाऱ्या कोपऱ्यातल्या
पालथ्या शिबड्याखाली पीठ पसरलेलं
पिठावर निरांजन मंद तेवणारं
शिंबड्याच्या असंख्य फटींतून
गूढ प्रकाशाच्या रेघा बाहेर पडलेल्या.
तुझी चिमुकली पावलं पुढच्या जन्मातली
त्या पिठावर उमटतील...
...आणि तू कोण झालायस हे आम्हाला कळेल,
असं कुणीतरी कुजबुजत सांगत होतं कुणाला तरी

तू किंगफिशरही होऊ शकतोस
किंवा किंग कोब्राही.
पण कसं कळायचं
तू कोण झाला आहेस...

तुला सारी सृष्टीच आवडायची...
...पण तू माणूस मात्र निश्चितच होणार नाहीस.

माणसांचा हल्ली तिटकाराच यायचा तुला.

३८ / कबुतरखाना