या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समुद्राखाली बुडत चाललेली गावं बघितली की
तुझ्या डोळ्यांत समुद्र साकळायचा.

जंगलात तुटणारी आणि वणव्यात पेटणारी
झाडं बघितली की तुझ्या डोळ्यात अंगार फुलायचा.
जळफळायचास तू जंगल होऊन.

वर आभाळाकडं बघायचास
सूर्यास्ताचा फोटो काढताना...
कारखान्यांच्या चिमण्यातून
धुरांचे लोट बघून गुदमरून जायचास...

तुझी संवेदना तुला आमच्यातून घेऊन गेली
पण नव्या जगात कुठल्याही योनीत
तू जन्मलास तरी तुझ्यातला रसिक कवी
त्या त्या जीवांच्या भाषेत कविता निश्चित करेल
सकळांना शहाणं करणारी...

...तरी पण
तू आता कोण झाला असशील...?
तुला खूप भेटावसं वाटतं रे !

कबुतरखाना / ३९