या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषा १

भाषा तू बोललीच नाहीस
शब्द तू उच्चारलेच नाहीस
पण लहरत आलं गाणं तुझ्या डोळ्यांमधून मुक्यानंच
त्या प्रत्येक वेळी शब्दांनी वसंतोत्सव साजरे केले माझ्या उरात
भाषा घडवत आली संवाद तुझ्या-माझ्यात,
पुढाकारही तिचाच
तुझं माझं जग एकमेकांत बेमालूम मिसळण्यात
त्यातही पुन्हा तू तुझं जग सावरतेस नेटकं
मी मात्र त्यात माझं जग धसमुसळून मिसळतो
या धसमुसळण्यात, या सावरण्यात,
डाव मोडता मोडता पुन्हा दुवा साधते भाषा.
तुझी माझी भाषा.

भाषा तुझी-माझी
तशीच ती तो, ती, ते आणि त्यांची
मग संदर्भाबरोबरच बदलत जातात नाती आणि अर्थ
भाषेच्याच काळोखात चाचपडतात स्वार्थ परमार्थ

प्रत्येकजणच एक 'बंडल' झालेला
न उलगडणाऱ्या अर्थांच्या गुंतवळ्यांचं
त्यातले काही गुंते तू आणि मी
एकत्र बसलो सोडवायला
तुला - मला वाटलं, ‘गुंता सुटला. '
आता कळतंय ‘गुंत्यात तू अन् मीही गुंतलोय. '
'भाषा कशाला हवी?'
तरीही मलाच सारं कळाल्याची!
तसं केलं की सगळेच हसतात मोकाट आणि हसायची लिपी नसते.

४० / कबुतरखाना