या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ट्रेनिंग

हे अश्वत्थाम्याऽऽ!
सुकल्या स्तनातून रोगांचा वारसा शोषत
ते रांगायला लागले

त्यांनी कधीच धरला नव्हता हट्ट दुधाचा
तरीही... डुकरांनीही खाल्लं नसतं ते पचविण्याची ताकद
हे अश्वत्थाम्या, त्यांना वारसाहक्कानं मिळालीय
... तुझ्या कपाळावरच्या प्रचंड स्वयंभू जखमेसारखी
पाण्यात पीठ कालवून दुधाची समजूत काढता येते पोरांची
हे त्यांच्या आयांनाही ठाऊक नाही

हे अश्वत्थाम्याऽऽऽ!
रस्त्याकडेच्या टीव्हीच्या दुकानात
दाखवल्या जाणाऱ्या इन्स्टंट खाद्यपदार्थांच्या जाहिराती
काचेबाहेरून आशाळभूतपणे पाहणाऱ्या
त्यातल्या चारपाच पोरांच्या निस्तेज म्लान वाटोळ्या डोळ्यांत
उजाडण्याआधीच संध्याकाळच्या लांब सावल्या पसरल्या आहेत

आणि तुझं नितळगूढ, चिरंजीवी प्रतिबिंबही डहुळलंय त्यांच्या डोळ्यांत

त्यांच्या आया त्यांना जन्माला घातल्यावर
लगेचच तेल मागत हिंडायचं
ट्रेनिंग देतात म्हणे...

४४ / कबुतरखाना