या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साभार परत

एखादी कविता
साभार परत यायची
तेव्हा...

मूल मधूनच शाळेतून
परत आल्यासारखं वाटायचं...

त्याचा धसमुसळेपणा
खरचटल्याची एखादी खूण
रपाटा खाल्ल्यानंतर
दाबून ठेवलेला हुंदका
अभ्यासातल्या कच्चेपणाची
शाळेची तक्रार
या सगळ्याचं ओझं
दप्तरात भरून आलेल्या
उनाड पोरासारखी...
एखादी कविता
साभार परत यायची,
दप्तर भिरकावायची
अपेक्षांचं.
आणि उड्या मारत पुन्हा
बाहेर पडायची
बंधमुक्त झाल्यासारखी
दबावालाच वेडावून दाखवत

कबुतरखाना / ४५