या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जमीनदोस्त

माझ्या खांद्यावर वस्तीला आलेल्या पाखरांनो,
निवांत झोप घ्या.
या काजळल्या अंधारात माझ्या पानापानांचा
आडोसा करून...

या थर्थरीवर जाऊ नका
मी घाबरलो नाही.
मी गहिवरून आलोय आनंदानं
तुमच्या उरातली धडधड ऐकून
माझं पाननूपान लढवीन तुमच्या संरक्षणासाठी
आजची रात्र निवांत झोप घ्या!
...पण उद्या इथं थांबू नका!
दू ऽऽऽ र जा... कारण इथं उठणार आहेत
भावनाशून्य बर्फाची वादळं

दूर जा !
जिथं फुलल्या असतील हर्षाच्या बागा
आणि जिथं नसेल तुमच्या कंठाला अनामिक हुरहूर

थांबू नका इथं उद्या आळसावून, दोस्त !
नाही तर या पानगळीबरोबर

तुम्हीही व्हाल जमीनदोस्त

४८ / कबुतरखाना