या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कबुतरखाना

माझ्या कबुतरखान्यात
कितीतरी कबुतरं 'गुटुर घूंऽऽ' घुमताहेत्...
सांभाळून ठेवलीयत् कप्प्याकप्प्यात
या माझ्या कबुतरखान्यात...

एक कबुतर आहे मैत्रीचं
त्याला मी दाणे घालत असतो अक्षय प्रेमाचे
ते सदैव घुमत असतं आपल्याच तालात
या माझ्या कबुतरखान्यात...

एक कबुतर आहे सग्यासोयऱ्यांचं
ते मात्र मारत असतं चोच, पिसं फुलवून तोऱ्यात
दाणे घालणाऱ्या हातांवरच...
कर्तव्य म्हणून त्याला घालावाच लागतो खुराक
या माझ्या कबुतरखान्यात...

एक कबुतर आहे सामाजिक जाणिवांचं
त्याला काय खायला घालू ?
काहीही घाला... ते उघडायचंच नाही चोच
...आता तर त्याची चोचच उघडी पडलीय
ते पडलंय उपड... थंडगार... भावहीन... निश्चल
सताड डोळे... ताणलेले पाय... निस्तेज काया
गावागावातून सुटलीय त्याच्या चर्चेची दुर्गंधी
आणि मरून चाललीयत साथीतल्या रोगासारखी
सगळ्यांच्याच कबुतरखान्यातली सामाजिक जाणिवांची
शुभ्र पांढरी कबुतरं.

...आणखी एक कबुतर होतं तुझ्या-माझ्या नजरबंदीचं
ते मात्र कधीचंच सटकलंय हातातून

आणि जाऊन बसलंय

कबुतरखाना / ५३